मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लोकप्रियता आता थेट लंडनपर्यंत पोहोचणार आहे. इंग्लंडचा एक २३ वर्षीय तरुण चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे टी-शर्ट घालून संपूर्ण जग सायकलवरून पालथे घालत आहे. इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर वकिली व्यवसायात स्थिरावण्याऐवजी जोशाह स्केट्स या तरुणाने सायकलवरून संपूर्ण जग पालथे घालण्याचा निर्धार केला आणि ध्येयाने झपाटलेल्या या अवलियाने सायकलला पॅडल मारले. विशेष म्हणजे तब्बल २३ देश सायकलवरून पालथे घातल्यानंतर तो भारतात दाखल झाला. भारत भ्रमंतीत तो २७ सप्टेंबरला मुंबईत दाखल झाला. ऐन दिवाळीत मुंबईत आल्यानंतर त्याने पहिल्यांदाच येथे फटाके फोडण्याचा आनंद लुटला, येथील फराळाचा आस्वाद घेतला. करंजी आणि कांदेपोह्यांनी आपले मन जिंकल्याचेही जोशाहने सांगितले. चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्यासोबत या अवलियाची भेट झाल्यानंतर कार्यकर्त्याने जोशाहची कहाणी ऐकल्यानंतर त्याला आपल्या मंडळाचे टी-शर्ट भेट म्हणून दिले. जोशाह आता हेच टी-शर्ट घालून सध्या सायकल भ्रमंती करत आहे.
जोशाहचा आजवरचा प्रवास खूप नाट्यमय राहिला आहे. लंडनपासून तासाभरावर असलेल्या कँटरबरीचा रहिवासी असलेला जोशाह अवघ्या २३ वर्षांचा आहे. जोशाहने कायद्याचे शिक्षण घेत असतानाच्या पहिल्याच वर्षी सायकलद्वारे जगभ्रमंती केलेल्या व्यक्तिवरचा लेख एका संकेतस्थळावर वाचला आणि यातूनच प्रेरणा मिळाल्याचे जोशाह सांगतो. याच काळात त्याने फ्रान्स आणि अमेरिकेत प्रत्येकी सहा महिने नोकरी केली. त्यातून जमा झालेल्या पुंजीतून तो गेल्यावर्षी २४ मे पासून सायकलवरून यूके ते ऑस्ट्रेलियाच्या भ्रमंतीला निघाला. ही मोहीम अवघड आणि अतिशय खडतर असल्याने असे साहस न करण्याचा सल्ला मित्रांनी दिला. पण, कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे त्याने हे शिवधनुष्य पेलले. पहिल्या दिवशी पाच मित्रांनीही त्याच्या मोहिमेत सहभागी होत त्याला साथ दिली.