Viral Video: आपल्यातील अनेक जण प्राणिसंग्रहालय, जंगल सफारीला भेट देतात. चिमुकल्यांचे जंगलातील प्राणी दाखवण्याच्या बहाण्याने आपण स्वतःचीही हौस नकळत पूर्ण करून घेत असतो. कारण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन आपसूकचं शांत होऊन जाते. जंगलातील प्राणी, मुक्त हवेत उडणारे पक्षी, पानं-फुलं पाहून प्रत्येकाला एक वेगळाच आनंद मिळतो. तसेच यासगळ्यात वाघ, सिंह यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पाहण्याची उत्सुकता अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनात असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध वाघीण पर्यटकांना तिच्या पंजाने जणू काही हातवारे करताना दिसून आली आहे.
वाइल्डलाइफ फोटोग्राफी वन्यजीवांचे अनेकदा असे क्षण कॅप्चर करतात जे सर्वांनाच थक्क करून सोडतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. तर येथील अलीकडेच शूट केलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. फोटोग्राफर निखिल गिरी यांनी एक क्षण कॅप्चर केला आहे जो अगदीच जादुई वाटतो आहे. प्रसिद्ध ‘वाघीण माया’ पर्यटकांना पंजाने हातवारे करताना दिसून आली आहे. एकदा बघाच हे जादुई दृश्य.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मनमोहक व्हिडीओमध्ये वाघीण एका पाणवठ्याजवळ आली आहे. कॅमेऱ्याकडे पाहण्यापूर्वी ती पाणवठ्याजवळ येऊन तहान भागवते आहे. तर अचानक तिची नजर तेथे छायाचित्रकार वा पर्यटकांकडे जाते. तसेच बघता बघता ती तिचा पंजा वर करते आणि जणू काही पर्यटकांना हाय, हॅलो म्हणते आहे असे दृश्य यावेळेस कॅप्चर झाले आहे. हा अद्भुत क्षण पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहतचं रहाल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ फोटोग्राफर निखिल गिरी यांच्या @pixelindetail इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा खास क्षण टिपला’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘एकदम अविश्वसनीय’ तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, म्हणूनच मला वन्यजीव फोटोग्राफी आवडते. कारण हे असे दुर्मिळ आणि सुंदर क्षण जगासमोर आणते’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.