‘तेजाचा उत्सव’ असलेल्या दीपोत्सवात फटाक्यांची आतषबाजी, रंगीत रांगोळी, फराळ आणि नव्या कपडय़ांनी रंग भरले आहेत. दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारे लक्ष्मीपूजन रविवार होत आहे. या निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्ताचे औचित्य साधत अनेकांनी घरकुल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृहोपयोगी साहित्य, सोने-चांदी खरेदी करण्याकडे कल ठेवला आहे. व्यावसायिकांनी या निमित्ताने विविध सवलतींचा ग्राहकांवर भडीमार केला असून बाजारपेठेत कोटय़वधींची उलाढाल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मीपूजना निमित्ताने घराघरात तसेच व्यावसायिक, दुकानदार, औद्योगिक वसाहतींमध्येही लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. बाजारपेठेत शाडुमातीच्या लहान आकारातील आकर्षक मूर्त्यां दाखल झाल्या आहेत. प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडून मुर्तीला प्राधान्य दिले जाते. यासाठी भरीव व पोकळ या प्रकारात सराफ व्यावसायिकांकडून पूजा उपकरणांसह चांदीच्या तसेच चांदीचा वा सोन्याचा मुलामा असलेल्या लहान मोठय़ा आकारातील लक्ष्मी मुर्त्यां उपलब्ध करून दिल्या आहेत. यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी असे विविध प्रकारही आहेत.
घरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीक मानत ‘त्वं ज्योतिस्तवं रविश्वन्दरो विधुदग्निश्च तारका, सर्वेषा ज्योतिषां ज्योतिर्दीपावल्ये नमो नम’ मंत्र उच्चारत तिची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनानंतर साऱ्यांनाच साईच्या लाह्य़ांचा प्रसाद देण्यात येतो.

‘प्लॅट’ संस्कृतीत केरसुणीरूपी असणाऱ्या लक्ष्मीचे अस्तित्व लोप पावत असतांना अनेकदा नारळाला लक्ष्मीचे रुप देत तीची पूजा-अर्चना करण्यास प्राधान्य दिले जाते. महालक्ष्मीचा मुखवटा, किंवा देवीचे डोळे, नाक, असे साहित्य खरेदी करत नारळाला देवीच्या मुखवटय़ाचे रुप देत तिची पूजा काही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासुन केली जात आहे. मूर्तीचा विर्सजन विधी पाहता काहींनी लक्ष्मीची प्रतिमा असलेल्या धातुच्या मूर्तीना प्राधान्य दिले आहे.

व्यावसायिकांकडून या दिवसाचे सोने करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, फर्निचर, मोबाईल, वस्त्रे आदी वस्तुंवर आकर्षक सवलतींसह खास भेटवस्तुंचे नियोजन करण्यात आले आहे. सराफ व्यावसायिकांनी पुढील लग्नाचा काळ पाहता मजुरीवर सुटसह आकर्षक भेटवस्तूची बेगमी केल्याने महिला वर्गाने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत काही दागिन्यांची आगाऊ नोंद करून ठेवली आहे. महागाईची काहीशी ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठांमधील खरेदीचा माहौल कायम आहे.

लक्ष्मीपूजन विधी असा करावा- ध्वनीफीत