बलात्कारासाठी महिलांचे तोकडे, तंग कपडेच कारणीभूत असतात अशी मानसिकता फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडितेनं काय घातलं होतं? हा हीन प्रश्न पहिल्यांदा विचारल्याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाही. पण, बलात्कारासाठी कपडे कारणीभूत नसून मनातली विकृती कारणीभूत आहे हे दाखवून देण्यासाठी ब्रसल्समध्ये कपड्याचं एक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ज्यात पीडितेनं त्यावेळी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केले होते त्या कपड्यांची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
हे प्रदर्शन सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. खरं तर महिलांच्या पेहरावामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतात किंवा छेडछाड केली जाते असे अकलेचे तारे जगभरात तोडले जातात. पण, याला कपडे नाही तर मानसिकता कारणीभूत आहे हे या प्रदर्शनातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या ज्या तरुणी, महिलांवर बलात्कार झाले त्यावेळी त्यांनी जे कपडे घातले होते त्याची प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आली. ‘कोणाच्याही लैंगिक भावना चाळावतील असा एकही कपडा यात नव्हता. अंग झाकणारे साधे, कपडे त्या त्यावेळी पीडितांनी परिधान केले होते. कोणीही परिधान करू शकतात असे साधे कपडे त्यावेळी प्रत्येकीच्या अंगावर होते. तरीही कपड्यांमुळेच बलात्कार होतात असा कांगावा जगभर केला जातो, आणि यात त्या पीडितेलाच दुषणं दिली जातात. हीच हीन मानसिकता खोडून काढण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तसेच कपड्यांवरून बलात्कार पीडितेला प्रश्न विचारले जाणे पूर्णपणे चुकीचं आहे असं CAW संस्थेच्या कर्मचारी लेझीबेथ यांनी सांगितलं आहे. २० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे.