इंग्लंडमध्ये McDonald’s मधून मागवलेल्या चिकन नगेटमध्ये चक्क फेस मास्क सापडल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एक लहान मुलगी चिकन नगेट खात असताना तिच्या आईला तो फेस मास्क दिसला आणि आईने अक्षरशः तिच्या घशामध्ये बोट घालून ते चिकेन नगेट बाहेर काढल्याची घटना घडली आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, 32वर्षांच्या लॉरा आर्बर यांनी मंगळवारी(दि.4) इंग्लंडमधील आल्डरशॉट इथल्या मॅकडोनाल्डच्या शाखेतून चिकन नगेट विकत घेतले. पण, नगेट खात असताना अचानक सहा वर्षांची मुलगी मॅडीच्या घशात काहीतरी अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पटकन अक्षरशः तिच्या घशामध्ये बोट घालून ते चिकन नगेट बाहेर काढलं. त्यात चक्क निळ्या रंगाचा फेस मास्क होता, असा आरोप लॉरा यांनी केला आहे.
या प्रकारानंतर लॉरा यांनी तातडीने मॅकडोनाल्डच्या शाखेत संपर्क साधला, पण त्यावर मॅनेजरने नगेट आपल्या इथे बनत नसून आम्ही फक्त तळून देतो असं सांगितलं. तर, “आम्ही कोणतीही उणीव राहू नये यासाठी कठोर नियमांचं पालन करत असतो. घडलेल्या प्रकाराची चौकशी करत आहोत”, असं मॅकडोनाल्डच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच मॅकडोनाल्डकडून लॉरा यांची माफीही मागण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारामुळे लॉरा मात्र चांगल्याच संतापल्या आहेत. “मी जर घरात नसते, तर माझ्या मुलीसोबत काय झालं असतं याचा मी विचारही करु शकत नाही”, अशा शब्दात त्यांनी आपली भीती व्यक्ती केली.