मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर #10YearChallenge चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेकांनी या चॅलेंज अंतर्गत आपले फोटो फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर (इन्स्टाग्राम हे फेसबुकच्याच मालकीचे आहे) अपलोड केले आहेत. यामध्ये अनेक सामान्य नेटकऱ्यांबरोबरच हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमधील कलाकारांचाही समावेश आहे. एका अंदाजानुसार ५० लाखहून अधिक नेटकऱ्यांनी आत्तापर्यंत आपले दहा वर्षांपूर्वीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आहेत. पण या चॅलेंजमागे फेसबुकचा एक छुपा अजेंडा असल्याचे मत तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

#10YearChallenge व्हायरल झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी या चॅलेंजमागील उद्देशांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांच्या मते फेसबुकने मुद्दाम हे चॅलेंज व्हायरल केले आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून फेसबुकला आपल्या युझर्सचा डेटा गोळा करण्यात रस असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे. दहा वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे फोटो हे फेसबुकच्या आगामी फेस रिकग्नेशन सॉफ्टवेअरसाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत मशीन लर्निंगसाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय फेसबुक हा डेटा थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सला विकणार असल्याचीही शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

#10YearChallenge संदर्भात सर्वात आधी प्रश्न उपस्थित केला तो ‘वायर्ड’ या मासिकामधील स्तंभ लेखिका असणाऱ्या केट ओनील हिने. ‘फेसबुक हा सर्व डेटा त्यांच्या वयासंदर्भातील फेशियल रेक्गनेशन अल्गोरिदमला मजबूत बनवण्यासाठी वापरु शकते.’ अशा आशयाचे ट्विट केटने केले होते. या ट्विटला ११ हजारहून अधिक रिट्वीट मिळाले असून २४ हजारहून अधिक जणांनी ते लाइक केले आहे.

‘वार्यड’साठी लिहीलेल्या लेखामध्ये केट म्हणते, ‘या व्हायरल झालेल्या ट्रेण्डमुळे आता फेसबुककडे दहा वर्षांपासून आत्तापर्यंतच्या फोटोंचा एक चांगला डेटाबेस तयार झाला आहे. मात्र हा ट्रेण्ड सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून डेटा मिळवण्याचा प्रयत्न नाही असं आपण म्हटलं तरी मागील काही वर्षांमध्ये युझर्सचा डेटा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्लिकेशन आणि व्हायरल चॅलेंजेचा आधार घेतला जात आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणामध्ये फेसबुकवरून ७ कोटी अमेरिकन नागरिकांचा डेटा चोरण्यात आला. त्यामुळेच आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद साधताना कोणती माहिती देतो आणि ती कशाप्रकारे वापरली जाऊ शकते याचा आधी विचार करणे गरजेचे आहे.’

#10YearChallenge बद्दल शंका उपस्थित करणाऱ्या केट ही एकटीच नसून लेखिका आणि एनवाययू स्टर्न स्कूल ऑफ बिझिनेस येथे प्राध्यापक असणाऱ्या अॅमी वेब यांनीही ‘सीबीएस न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना या व्हायरल चॅलेंजमागील उद्देशांबद्दल शंका उपस्थित केली आहे. ‘मशिन लर्निंगसाठी खाद्य पुरवण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे. या चॅलेंजमुळे फेसबुकच्या मशीन लर्निंग सिस्टीम्सला युझर्सच्या दिसण्यामध्ये होणाऱ्या अगदी लहान बदलांचाही बारकाव्याने अभ्यास करता येईल.’

मात्र याबद्दल फेसबुकनेही स्पष्टीकरण दिले आहे. आपला या चॅलेंजशी काहीही संबंध नसून या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारचा डेटा गोळा करत नसल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. फेसबुकने जारी केलेल्या निवेदनानुसार ‘हे युझर्सने सुरु केलेले चॅलेंज असून ते व्हायरल झाले आहे. फेसबुकने हा ट्रेण्ड सुरु केलेला नाही. या ट्रेण्डमधून फेसबुकला काहीच मिळत नाही. तसेच फेसबुक युझर्स फेस रेक्गनेशन फिचर त्यांना हवे तेव्हा सुरु किंवा बंद करु शकतात.’

एकीकडे फेसबुकने या सर्वांशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले असले तरी सोशल नेटवर्किंगव डेटा शेअर करताना युझर्स विचार करत असल्याचे सकारात्मक चित्र आता दिसू लागले आहे. आपण कोणता डेटा, आपली कोणती माहिती सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करतोय, त्याचा कसा वापर होऊ शकतो, ही माहिती शेअर करणे गरजेचे आहे का असे अनेक प्रश्न युझर्स स्वत:ला विचारताना दिसत असल्याने ते त्यांच्या डेटाबद्दल सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader