आपलं सगळं जीवन सोशल नेटवर्कवर आता कैद झालं आहे. त्याबरोबर आपली माहितीही आपणच टाकल्यामुळे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. माहितीच्या या महाजालात कोण कोण आपल्यावर नजर ठेवून आहे हे थेट सांगता येणं मु्ष्किल असतं. सोशल मीडियाच्या स्फोटाआधीच्या काळात आपल्यावर कोण नजर ठेवून आहे याचा थोड्याफार मेहनतीने माग काढणं सोपं होतं. पण आता इंटरनेटवरून आपली माहिती जगाच्या कुठल्या कोपऱ्यात गेली असेल हे ताडणं कधीकधी सरकारी यंत्रणांना शोधणंही कठीण ठरतं.

त्याहीपुढे जात जर आपली माहिती काढू पाहणारे संगणकतज्ज्ञ असतील तर आणखीच वाईट. कारण सर्वसामान्य यूझर्सच्या तांत्रिक अज्ञानाचा फायदा घेत सफाईने त्यांची संपूर्ण जीवनकुंडली हे हॅकर्स काढू शकतात. जर एका मोठ्या जनसमुदायाच्या बाबतीत त्यांना असं काही करायचं असेल तर ते यासाठी व्हायरस, साॅपफ्टवेअर किंवा अॅपच्या माध्यमातूनही ही हेरगिरी करू शकतात.

अशा मंडळींच्या या हेरगिरीला आता चाप बसणार आहे. कारण फेसबुक डेटाचा वापर हेरगिरीसाठी मुळीच करू दिला जाणार नाही असं आता फेसबुकने जाहीर करत या हॅकर्सना एका प्रकारे तंबीच दिली आहे.

फेसबुकशी संबंधित अॅप तयार करणाऱ्या डेव्हलपर्सना फेसबुककडून अनेक प्रकारचा डेटा उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये हजारो किंवा लाखो यूझर्सच्या आवडीनिवडी, त्यांनी फेसबुकवर टाकलेली इतर माहिती याचा समावेश असू शकतो. या माहितीचा वापर हे डेव्हलपर्स जाहिरातींसाठी करू शकतात. पण अलीकडच्या काळात फेसबुककडून मिळवलेल्या या माहितीचा उपयोग काही साॅफ्टवेअर डेव्हलपर्सकडून लोकांवर पाळत ठेवण्यासाठी किंवा हेरगिरी करण्यासाठी केला गेल्याचं समोर आल्याने फेसबुकने आता याच्याविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे

Story img Loader