तेरा वर्षांपूर्वी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्कने झकरबर्गने हार्वर्डमधलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. हार्वर्डमधल्या वसतीगृहातल्या खोलीत बसून ‘फेसबुक’ या सगळ्यात मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटची त्याने निर्मिती केली. दोन दिवसांपूर्वीच मार्कने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हार्वर्डमधल्या आठवणींना उजाळा दिला होता. फेसबुक निर्माण करण्याचं त्याचं एक मोठं स्वप्न त्याने पूर्ण केलं. पण हार्वर्डमधून पदवी संपादन करण्याचं त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. आज तेरा वर्षांनंतर अखेर हे स्वप्न पूर्ण झालं. हार्वर्ड विद्यापीठातर्फे पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.
‘आई, मी तुला नेहमी सांगायचो मी कधीतरी या विद्यापीठात येईन आणि पदवी घेईन. आज ते स्वप्न पूर्ण झालं’ असं म्हणत त्याने हार्वर्डमधल्या दीक्षांत सोहळ्याचा फोटो शेअर केला. हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने या विद्यापीठातले अनेक किस्से सांगितले. त्यातला सगळ्यांना आवडला तो मार्कची पत्नी प्रिसिला चॅनहिच्या सोबतचा किस्सा. प्रिसिला आणि मार्क या दोघांचीही भेट याच कॉलेजमध्ये झाली होती. तसं कॉलेजमधलं प्रेमप्रकरण सुरू होतं ते कँम्पसमध्ये, कॉलेजच्या वर्गात, कँटिनमध्ये किंवा ग्रंथालयात. पण प्रिसिला आणि मार्कच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली ती प्रसाधनगृहाच्या रांगेत.
वाचा : माणूस म्हणून रतन टाटांना जाणून घ्यायचं असेल तर हा किस्सा जरूर वाचा
मार्कच्या मित्रांनी पार्टी ठेवली होती, यावेळी प्रिसिला तिच्या मैत्रिणींसोबत आली होती. पण पार्टीत काही दोघांचं बोलणं झालं नाही, अखेर मार्कला प्रिसिला प्रसाधनगृहाच्या रांगेत दिसली आणि तिथेच त्याने आपल्या प्रेमाची कबुली प्रिसिलाला दिली. ‘या कॉलेजमधून मला लवकरच हुसकावून लावण्यात येणार आहेच माझ्याकडे फक्त तीन दिवस उरले आहेत तेव्हा आपण घाई करायला पाहिजे’ असं म्हणत मार्कने प्रिसिलापुढे रांगेतच प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काहीच दिवसांत मार्कने शिक्षण अर्धवट सोडलं आणि ‘फेसबुक’च्या निर्मितीवर अधिक लक्ष दिलं. हार्वर्डमध्ये दोघांना फार काळ एकत्र घालवता आला नसला तरी मार्कने पुढे प्रिसिलाशीच लग्न केलं.