‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात आभासी चलन. पाश्चात्य देशात ‘लाईटकॉइन’, ‘एथेरियम’, ‘डॅश’, ‘कार्डानो’, ‘झेडकॅश’ यांसारख्या आभासी चलनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु आशियाई देशांत तज्ज्ञांकडून अशा प्रकारच्या आभासी चलनांच्या व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात असतानाच काहीशा गोंधळलेल्या वातावरणात आता फेसबुकच्या ‘ग्लोबल कॉइन’चे आगमन होत आहे. अर्थात, फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, ‘ग्लोबल कॉइन’ नावाचे हे आभासी चलन २०२०च्या पहिल्या तिमाहीत जगभरात जारी केले जाण्याची शक्यता आहे. हे आभासी चलन फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही वापरता येईल. एवढेच नव्हे तर फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल. फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल, अशी तंत्रजगतात चर्चा आहे. अगामी काळात फेसबूक व्यतिरीक्त ‘टेलिग्रमान’, ‘सिग्नल’, ‘जे.पी. मॉरगन’, आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या धनाड्य कंपन्या देखील चलन व्यवसायत उतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, फेसबुकचे जगभरातील वापरकर्ते पाहिले तर इतर चलनांच्या तुलनेत ‘ग्लोबलकॉइन’चा वापर वाढेल अशी शक्यता तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे. मात्र, फेसबुककडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, आपण याचा वापर आर्थिक देवाणघेवाणीसाठी करू शकतो. २००९ साली सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे.

Story img Loader