रेल्वे आपल्या सगळ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. मग ते रोजच्या रोज धक्के खात मुंबई लोकलने जाणं असो की सिंधुदुर्गाक कोकण रेल्वेन् जावचा आसात, रेल्वे ती आलीच. आता गावाला जाताना एसटीचा पर्याय असला तरी दिल्लीबिल्लीला जायचं म्हणजे ट्रेनच हवी.
एक्सप्रेसचा प्रवास पण मस्त, हवा खात,गाणी एकत गप्पा मारत स्वस्थपणे दिवस काढायचा. वाट्टेल ते करायचं , खायचं प्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या हव्या त्या स्टेशनला उतरायचं. एक्सप्रेसमधला स्टाफपण तसा ठीकठाक असतो. जेवण वगैरे चांगलं आणून देतात.
पण आपण या जेवणाचे जे पैसे देतो त्याची पावती मागतो का? प्रवासाचा मूड स्पाॅईल करणं टाळण्यासाठी आपण ही डोकेदुखी मागे लावून घेत नाही. पण एका फेसबुक यूझरने यासंबंधी एक पोस्ट टाकली आणि ही पोस्ट तुफान व्हायरल झालीये.
सौजन्य-फेसबुक
प्रतप्त दास या फेसबुक यूझरने ही पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्याने शिवेंद्र सिन्हा या निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला आलेला अनुभव आपण सगळ्यांपुढे ठेवत आहोत असं त्याने म्हटलंय.
त्याच्या पोस्टनुसार सिन्हा यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून व्हेज थाळीचे ९० रूपये घेण्यात आले. त्यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर चेक केलं असता त्यांना या थाळीची किंमत फक्त ५० रूपये लिहिलेली दिसली. त्यांनी केटरिंग स्टाफला ५० रूपये दिल्यावरही त्याने आणखी ४० रूपये मागितले. सिन्हांनी त्याला वेबसाईट दाखवल्यावर तो चपापला आणि ‘कोणाला सांगू नका’ असं सांगत ५० रूपये घेत निघून गेला.
Viral Video : ‘ए भाऊ विमानतळ कुठे राहिलं?’
याविषयी पँट्री इन-चार्जला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि शेवटी अर्ध्या तासाने तक्रारपुस्तक आणून दिलं. यानंतर त्याचा नूर पालटला आणि तक्रार लिहू नका म्हणून तो विनंती करायला लागला. सिन्हांनी तक्रार लिहिल्यावर मात्र त्याचा उध्दटपणा पुन्हा समोर आला. ‘या तक्रारीचं काहीही होणार नाही’ असं उर्मटपणे सांगत त्याने त्या पुस्तिकेत सिन्हा यांनी लिहिलेल्या तक्रारीसारखं काही झालंच नसल्याचा शेरा लिहिला. त्याही पलीकडे जात हा प्रवासी प्रत्येकवेळा तक्रार करतो असा खोटा शेरा त्याने दिला.
‘देशभर रेल्वेने दरदिवशी अडीच कोटी लोक प्रवास करतात. यातल्या ०.५ टक्के जणांनीही जर जेवणाची आॅर्डर दिली आणि प्रत्येक थाळीमागे ३०-४० रूपये जास्त दिले तर पावणेचार कोटी रूपयांचा काळाबाजार होतो’ प्रतप्त दासने दिलेली ही आकडेवारी थक्क करणारी आहे. सिन्हा प्रवास करत होते त्या ट्रेनचं केटरिंग आयआरसीटीसीच्या थेट अखत्यारीत येत नसलं तरी आयआरसीटीसीच्या केटरिंगमध्येही कर्मचाऱ्यांकडून असे प्रकार घडतात.
वाचा- हिटलरच्या टेलिफोनचा लिलाव, ६७ लाखांपासून बोलीला सुरुवात
हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने नेटवर साहजिकच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. सध्याच्या काळात सगळी माहिती,अगदी सरकारदरबारी असणारी माहितीही मुक्तपणे इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती सजगपणे पाहून, त्याचा योग्य वापर करत स्वत:च्या अगदी मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं आपल्या सगळ्यांनाच शक्य आहे. गरज आहे ती ही माध्यमं मनोरंजनासोबत माहितीसाठीही वापरण्याची.
[jwplayer 1zLrQ1sm]