RSS Sambhal Violence Fact Check : उत्तर प्रदेशातील संभल हे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाण मानले जाते. मात्र, याच संभल शहरात काही दिवसांपूर्वी मशिदीवरून जातीय हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे शहर आता जातीय संकटाच्या गर्तेत आहे. अशातच लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर संभल धार्मिक हिंसाचाराशी संबंध जोडून एक व्हिडीओ शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडीओसह दावा केला जात आहे की, संभलमध्ये जातीय हिंसा भडकावण्यासाठी आरएसएस कार्यकर्त्यांद्वारे शस्त्रे आणि दारुगोळा पुरवला, तुपाच्या डब्यात लपवून हा शस्त्रसाठा संभलमध्ये नेला जात होता, मात्र पोलिसांनी तो पकडला. पण, खरंच अशाप्रकारची काही घटना घडली आहे का याचा तपास आम्ही सुरू केला, तेव्हा एक मोठं सत्य समोर आलं, तेच आपण जाणून घेऊ…
काय होतय व्हायरल?
@KhalsaVision नावाच्या एक्स युजरने त्याच्या अकाउंटवरून दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
कोणताही दावा न करतादेखील व्हिडीओ अलीकडील म्हणून प्रसारित केला जात आहे.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज चालवून तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चमधून फारसे परिणाम दिसले नाही, त्यामुळे आम्ही Google वर कीवर्ड सर्च करून पुढे तपास सुरू ठेवला.
आम्ही काही कीवर्डस वापरून शोध घेतला, ते इंग्रजीत या प्रकारे होते, “Weapons, pistols hidden in ghee recovered”
यावेळी आम्हाला सप्टेंबर २०१९ मध्ये हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेले एक वृत्त सापडले.
कीवर्ड सर्चमधून आम्हाला न्यूज नेशन नावाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओदेखील आढळून आला.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते की, दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी प्लास्टिकच्या डब्यातील तुपाच्या जाड थराखाली लपवून ठेवलेली तब्बल २६ पिस्तूल जप्त केली आहेत. पूर्व दिल्लीच्या गाझीपूर रोडवरून एका कार आणि दोन शस्त्रास्त्र विक्रेत्यांकडून बंदुकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण अहवाल पाहा.
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
तसेच आम्हाला २०१९ मध्ये एक्सवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला.
निष्कर्ष :
दिल्ली पोलिसांनी २०१९ मध्ये तुपाच्या डब्यांमध्ये लपवून ठेवलेली २६ पिस्तूले जप्त केली होती, ती शस्त्र विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आली होती. त्या घटनेचा व्हिडीओ आता संभल जातीय हिंसाचाराच्या घटनेशी जोडत आणि त्यात आरएसएस संघटनेचे नाव घेत खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.