बॉलीवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद याची बहीण मालविका सूद हिने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहिणीच्या प्रवेशानंतर सोनू सूदने देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. सोशल मीडियावर #SonuSoodWithCongress या हॅशटॅगचा वापर करून अनेक लोक सोनू सूदला काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत.
“सत्य, प्रामाणिकपणा, मानवता आणि गांधीजींच्या मार्गावर चालणारा प्रत्येक व्यक्ती काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. जनसेवक प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. #SonuSoodWithCongress” असं ट्विट एका सोशल मीडिया वापरकर्त्याने केलंय.
आज तकने दिलेल्या बातमीनुसार सोनू सूद काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा खोटा आहे. सोनू सूदची प्रवक्ता रितिका यांनी याबाबत ‘आज तक’ला माहिती दिली आहे. तसेच सोनू सूदने देखील यासंबंधी ट्विट केले असून आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नसल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जर सोनू सूद कोणत्याही पक्षात प्रवेश करणार असेल तर नक्कीच ही एक मोठी बातमी असेल. तसेच या घडामोडीची चर्चा प्रत्येक ठिकाणी झाली असती. परंतु अशा पद्धतीची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे सोनू सूद आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर देखील यासंबंधीची कोणतीही पोस्ट पाहायला मिळालेली नाही.
हेही वाचा : तालिबानाचा अजब फतवा; दुकानदारांना सांगितलं मुंडकं नसणारेच पुतळेच दुकानात ठेवा, कारण…
१० जानेवारीला सोनू सूदने ट्विटच्या माध्यमातून आपली बहीण मालविका सूदला काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबाबत शुभेच्छा दिल्या. सोबतच त्याने, “माझे अभिनयाचे करिअर आणि समाजकार्य कोणत्याही राजकीय पक्षाशी संगनमत न ठेवता असेच सुरु राहील.’ असं स्पष्ट केलं आहे.
सोनू सूदची बहीण मालविका सूदने १० जानेवारी २०२२ला काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याचसंबंधी पंजाब काँग्रेसने एक ट्विट केले होते. ‘आम्ही मालविका सूद सच्चर यांचे काँग्रेसच्या कुटुंबात स्वागत करतो. त्यांचे भाऊ अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद हे देखील त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अशी पसरली ही अफवा
काँग्रेस पक्षाचे व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट @INC_Television वरून एक ट्विट करण्यात आले होते. यात ‘प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश’ असे लिहण्यात आले होते. दरम्यान, हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. अर्थात, हे ट्विट काँग्रेसच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाउंटवरून करण्यात आल्याने मोठ्या संख्येने लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सोनू सूद काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा हा खोटा आहे.