विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, सभांबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही जोरदार प्रचार सुरु झाला आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यंगचित्र, व्हिडिओंच्या माध्यमातून टीका केली जात आहे. अशाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रचारगीत गाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ‘मनसे वृत्तांत अधिकृत’ या व्हेरिफाइड फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर बराच चर्चेत आहे. मात्र या व्हिडिओ खरा आहे की खोटा याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घेऊयात काय आहे या व्हिडिओमागील सत्य…
काय आहे व्हिडिओमध्ये
२१ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राबरोबरच हरियाणामधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी राज्यभरात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवरुन प्रचाराबरोबरच एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अमृता या स्टेजवरुन ‘घेऊन मनसेचा झेंडा हाती, बाई आला गं मनसेचा सेनापती’ गाणे गाताना दिसत आहेत. अमृता हे गाणे गात असताना समोर प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसलेले मुख्यमंत्री आपल्या मुलीसहीत पत्नीच्या या गाण्याला दाद देत त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी हा डब व्हिडिओ असून मुळ व्हिडिओशी छेडछाड करुन तो तयार करण्यात आला आहे. हा पाहा व्हायरल झालेला व्हिडिओ…
कधीचा आहे हा व्हिडिओ
व्हायरल झालेला हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असून तो मुंबई पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०१८’ या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता यांनी ‘फिर से’ हे गाणे गायले होते. त्यांच्या युट्युब चॅनेलवरही हा व्हिडीओ आहे.
याच व्हिडिओमधील एका मिनिटाचा तुकडा घेऊन त्यावर मनसेचे गाणे डब करत तो मनसेच्या समर्थकांनी फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवरुन व्हायरल केला आहे. इतकचं नाही मनसेच्या अनेक समर्थकांनी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र कोऑप्रेटीव्ह बँकेच्या प्रकरणानंतर सोशल नेटवर्किंगवर ‘आपली बँक, वहिनींची बँक’ असं म्हणतं केवळ अॅक्सिस बँकेतच काम करावे असं सांगत मनसेने अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.