कापूर जाळल्याने करोना विषाणू नष्ट होतो आणि त्यामुळे तुमचा बचाव होऊ शकतो. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भीमसेना कापूर हा उपाय आहे, अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र हे किती खरं आहे?
करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी उपाय सुचवणारे सध्या वेगवेगळे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या मेसेजेसमधून करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय सुचवले जात आहेत. मात्र यातील अनेक मेसेज हे खोटे असून निराधार असल्याचे दिसून आलं आहे. कापूर जाळल्याने करोना विषाणू नष्ट होतो आणि त्यामुळे तुमचा या विषाणूपासून बचाव होऊ शकतो, अशा प्रकारचा संदेश सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. भीमसेनी कापूर हा करोनावरील जालीम उपाय असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या दाव्याला कोणताही वैद्यकीय आधार नसल्याचे दिसून आलं आहे. जागतिक आऱोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरही या प्रकारची कोणताही माहिती उपलब्ध नाही. कापूर जाळळ्याने करोनाचा विषाणून नष्ट होतो याचा कोणताही ठोस, स्पष्ट आणि थेट पुरावा नसल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर करोनापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आहे. मात्र त्यामध्ये कापूर जाळण्यासंदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कापूर जाळल्याने करोनाचा विषाणू नष्ट होतो ही माहिती असत्य आणि वैद्यकीयदृष्ट्या निराधार असल्याचे दिसून आलं आहे.