Fact check Of Pakistan Old Misleading Video : पाकिस्तानमध्ये ४०० प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रेनवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २० लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीने असेही म्हटले आहे की, त्यांनी १८२ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. या वृत्तादरम्यान इंटरनेटवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो सूचित करतो की हा व्हिडीओ अलीकडील घटनेशी संबंधित आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला हा व्हिडीओ जुना असल्याचे आढळले.
नक्की काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर क्रिश पुरोहितने हा व्हिडीओ अलीकडील असल्याचा दावा करून शेअर केला आहे. ‘बलूच आर्मीने पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला केला. जाफर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आणखी १०० प्रवाशांना ओलिस घेतले आहे. या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचे सहा जवानही शहीद झाले आहेत’; अशी कॅप्शन दिली आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओ इनव्हिड टूलवर अपलोड केला, त्यातून कीफ्रेम्स काढले आणि कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
तेव्हा आम्हाला रोहन पंचीगरच्या एक्स प्रोफाइलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आढळला.
हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी, १५ एप्रिल २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
आम्हाला या व्हिडीओमधील एक दृश्य न्यूज९ प्लसच्या एक्स प्रोफाइलवरदेखील सापडले.
हा व्हिडीओ १२ सप्टेंबर २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
आम्हाला रेडिटवर दोन वर्षांपूर्वी पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने बलुचिस्तानच्या बोलान आणि सिबी जिल्ह्यांमधील मुशकाफ येथे पाकिस्तानी सैन्याच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला हल्ल्या केल्याचा दावा केला आहे.
हा व्हिडीओ बलुचिस्तानमधील असला तरी पाकिस्तानमध्ये ट्रेनवर झालेल्या अलीकडच्या हल्ल्याशी त्याचा संबंध नाही.
निष्कर्ष : २०२२ मधील एक व्हिडीओ पाकिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसवर बीएलएच्या हल्ल्याचा सांगून शेअर केला जात आहे, त्यामुळे आमच्या तपासानुसार व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.