अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एपस्टीन याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. जेफ्री एपस्टीन यांच्यावर लैंगिक शोषण आणि वेश्याव्यवसायासंबंधीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यात ते अटकेत असताना २०१९ साली त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर आता या प्रकरणांशी संबंधित काही न्यायालयीन कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. ज्यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली. जेफ्री यांची ब्रिटीश प्रेयसी गिलॅन मॅक्सवेल हिच्यावर खटला चालवण्यात आला. तिला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याशी संबंधित दस्तऐवज उघड केले जात आहेत. त्यामधील बडी नावे पाहून लोकांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू अशा उच्चपदस्थांचा या दस्तऐवजामध्ये समावेश आहे.

हे दस्तऐवज उघड झाल्यानंतर जेफ्री आणि डोनाल्ड ट्रम्प यांची काही आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामुळे जेफ्री यांच्या काळ्या व्यापाराशी ट्रम्प यांचाही संबंध आला होता का? असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. मात्र लाइटहाऊस जर्नलिझमने तांत्रिक तपासणी केल्यानंतर हे फोटो कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय (Artificial intelligence) द्वारे तयार करण्यात आल्याचे आढळले आहे.

हे वाचा >> विश्लेषण : जेफ्री एपस्टीन कोण होता? ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये ट्रम्प, क्लिंटन, स्टीफन हॉकिंग, मायकेल जॅक्सन ही नावे कशी?

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये काय आहे?

एक्स या सोशल साईटवरील डेव्हिड केबल या अकाऊंटवरून सदर फोटो पोस्ट करण्यात आला.

हा फोटो इतर लोकांनीही एक्स या सोशल माध्यमावर शेअर केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन विमानात एकत्र प्रवास करत असल्याचा फोटो एक्स वरील मस्करतने त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

आणखी अनेक लोकांनी अशाच प्रकारचे फोटो शेअर केले आहेत.

तपास :

पहिल्या चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. (रिव्हर्स इमेज सर्च म्हणजे एखाद्या फोटोची सत्यता तपासण्यासाठी वापरण्याची पद्धत. एखादा फोटो कोणी, कधी आणि कुठे वापरला आहे, याची माहिती यातून मिळते. यामुळे फोटोचा मूळ स्त्रोत कळतो. गुगल इमेजेसमध्ये जाऊन रिव्हर्स इमेज सर्च करता येते)

रिव्हर्स इमेज सर्च करूनही कोणत्याही विश्वसनीय वृत्त संकेतस्थळावर सदर छायाचित्र सापडले नाही. मात्र आम्‍हाला कम्युनिटी नोट्स असलेल्या काही पोस्ट्स आढळल्‍या. यामुळे हे फोटो बनावट असल्याचे लक्षात आले. या फोटोत काही विसंगती होत्या ज्या पाहताक्षणीच लक्षात येत नाहीत, जसे की गुळगुळीत त्वचेची रचना. त्यामुळे असे लक्षात येते कि हे छायाचित्र एआय निर्मित असू शकते.

त्यानंतर आम्ही एआय इमेज डिटेक्टरद्वारे जेफ्री आणि ट्रम्प काही महिलांसह बसल्याचा फोटो तपासून घेतला

Maybe’s या एआय डिटेक्टर टूलद्वारे फोटोंची तपासणी केली असता, हा फोटो कृत्रिम असण्याची शक्यता ५७ टक्के असल्याचे दिसले.

HIVE मॉडरेशन या टूलद्वारे तपासणी केल्यानंतर तिथेही हा फोटो एआयचा वापर करून तयार केल्याचे आढळले.

Donald Trump and Jeffrey Epstein
डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन यांचे व्हायरल झालेले फोटोंची तपासणी आणि त्याचा निकाल.

त्यानंतर आम्ही दुसरा फोटो तपासला. जिथे ट्रम्प आणि जेफ्री विमानात बसल्याचे दिसत आहे.

हाही फोटो एआयद्वारे तयार केला असल्याचे Maybe’s एआय डिटेक्टरने दर्शविले.

HIVE मॉडरेशनने तर हा फोटो एआयद्वारे तयार केला असल्याची ९९.९९ टक्के इतकी दाट शक्यता वर्तविली.

त्यानंतर आम्ही डोनाल्ड ट्रम्प आणि जेफरी एपस्टीन यांचे एकमेकांशी काही संबंध होते का? त्याचा तपास केला. आम्हाला व्हॅनिटी फेअरमध्ये एक लेख सापडला, ज्याध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जेफरी एपस्टीन या दोघांचा फोटो छापण्यात आला होता. या फोटोला Getty Images चे साभार देण्यात आले होते.

https://www.vanityfair.com/news/donald-trump-supporters-are-very-worked-up-about-the-jeffrey-epstein-list

CNBC संकेतस्थळावर एक बातमी सापडली. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनच्या घरी जेवण केले होते, अशी साक्ष घरकाम करणाऱ्या व्यक्तीने दिली होती.

https://www.cnbc.com/2024/01/05/-trump-had-meals-at-jeffrey-epstein-home-court-filing-shows.html

निष्कर्ष : डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन यांचे व्हायरल झालेले फोटो एआयद्वारे तयार करण्यात आलेले आहेत. ते खरे नाहीत.