Sanjay Nirupam Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. हा व्हिडीओ दोन व्हिडीओंचे संकलन करून बनला होता.
एका व्हिडीओमध्ये शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर संजय निरुपम बोलताना दिसत असल्याचा दावा केला आहे आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते शिवसेना शिंदे गटात दाखल होण्याच्या आधीचा असल्याचा दावा केला आहे. या दुसऱ्या व्हिडीओत संजय निरुपम, “एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या कपाळावर असे लिहिले पाहिजे की, त्याचे वडील गद्दार आहेत”, असे म्हणत असल्याचे दिसून आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर सुरेंद्र राजपूतने त्याच्या प्रोफाइलवर खोट्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजरदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही दोन्ही व्हिडीओंचा एकेक करून तपास सुरू केला. आम्ही प्रथम डावीकडील व्हिडीओ तपासला. आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या आणि YouTube कीवर्डदेखील सर्च केला. यावेळी त्या व्हिडीओत शिवसेना नेते संजय निरुपम हे मराठीत बोलताना दिसले. त्यामुळे आम्ही मराठी वृत्तवाहिन्या तपासण्यास सुरुवात केली,
आम्हाला एबीपी माझावर सहा दिवसांपूर्वी पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला. त्यात संजय निरुपम कुणाल कामरा वादावर बोलत होते.
सुमारे दोन मिनिटे ५५ सेकंदांत त्यांचे पहिल्या व्हायरल व्हिडीओतील विधान ऐकू येत आहे.
“राजकीय लोकांवर व्यंग केले जातात आणि आम्ही ते सहन करतो; पण तुम्ही कोणालाही गद्दार म्हणू शकत नाही. गद्दार म्हणजे फक्त व्यंग नाही,” असे निरुपम यात म्हणताना ऐकू येतेय. यावेळी त्यांनी असाही आरोप केला की, संजय राऊत यांनीच कामराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ‘गद्दार’ हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला असेल.
त्यानंतर आम्ही संकलनातील दुसऱ्या व्हिडीओचा तपास सुरू केला, तेव्हा आम्हाला त्यात फक्त ANI चा माईक दिसला.
आम्ही YouTube वर ‘संजय निरुपम ANI’ हा कीवर्ड सर्च केला. यावेळी ANI YouTube हँडलने पोस्ट केलेले सर्व व्हिडीओ समोर आले.
आम्हाला YouTube शॉर्ट्सवर असाच सेम व्हिडीओ सापडला.
आम्हाला ANI न्यूजवर १० महिन्यांपूर्वी पोस्ट केलेला एक व्हिडीओ आढळून आला.
व्हिडीओच्या सुरुवातीला संजय निरुपम म्हणतात, “शिवसेना उद्धव ठाकरे (UBT) गटाच्या महिला खासदाराने म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कपाळावर माझे वडील गद्दार आहेत, असे लिहिले पाहिजे.”
आम्हाला अशा बातम्या मिळाल्या, जिथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूर्वी हे विधान केले होते.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले पाहिजे की, माझे वडील गद्दार आहेत”.
निष्कर्ष :
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘गद्दार’ आहेत, असे कोणतेही विधान केलेले नाही. निरुपम यांचे व्हिडीओ एडिट करून खोट्या दाव्यांसह शेअर केले गेले आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे. या दोन्ही व्हिडीओ क्लिप करून खोट्या दाव्यांसह वापरले गेले आहेत.