PM Narendra Modi And George Soros Viral Photo : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. याचदरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसंदर्भात एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वृद्ध व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. मोदींबरोबर दिसणारी ती वृद्ध व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नाही तर अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस असल्याचा दावा केला जात आहे. तसेच व्हायरल फोटो पंतप्रधान मोदी आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील गुप्त भेटीदरम्यानचा असल्याचा दावाही यावेळी केला जात आहे. पण, पंतप्रधान मोदींनी खरंच जॉर्ज सोरोस यांची भेट घेतली का, याबाबतचे सत्य आपण जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @AchryConfucious ने त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणारा दावा करीत हा फोटो शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह तो फोटो शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही फोटोचा रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपास सुरू केला. यावेळी आम्हाला ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ‘डेक्कन हेराल्ड’ने अपडेट केलेली एक बातमी आढळली.
https://www.deccanherald.com/india/henry-kissinger-advocated-strong-ties-with-india-under-pm-modi-2790836
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : FILE PHOTO : या मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९ च्या फाइल फोटोमध्ये नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर यांच्याबरोबर आहेत. किसिंजर यांचे बुधवार, २९ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. क्रेडिट : पीटीआय
हेन्री किसिंजरच्या निधनानंतर ही बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात म्हटले आहे : १९७० च्या दशकात भारताच्या नेतृत्वाचा तिरस्कार करणारे हेन्री किसिंजर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले आहे; परंतु सुप्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व माजी परराष्ट्र सचिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक दशकापासून भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्याचा पुरस्कार करीत होते.
गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पुढे तपास सुरू केला तेव्हा आम्हाला ANI च्या एक्स हॅण्डलवर काही फोटो आढळून आले.
ते फोटो २२ ऑक्टोबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आले होते.
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक्स हॅण्डलवरही व्हायरल झालेला फोटो सापडला आहे, जो त्यांनी २२ ऑक्टोबर २०१९ रोजी फोटो पोस्ट केला होता.
निष्कर्ष :
व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिसणारी व्यक्ती अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस नाहीत, तर ते डॉ. हेन्री किसिंजर आहेत, जे एक सुप्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व माजी परराष्ट्र सचिव आहेत. त्यामुळे व्हायरल दावा बनावट आणि दिशाभूल करणारा आहे.