अक्षय कुमार म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते सामाजिक आणि देशभक्तीपर विषयांवर केलेले सिनेमे. मात्र ऑनस्क्रीन देशभक्ती शिकवणारा अक्षय कॅनडाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला आहे. सध्या अक्षयचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन भाजपा समर्थक असणाऱ्या अक्षयवर आणि भाजपावर तसेच मोदी समर्थकांवर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे. अनेकांनी या व्हिडीओचा संदर्भ सध्या गाजत असलेल्या नसीरुद्दीन शाह प्रकरणाशी जोडला आहे. हेच वक्तव्य खान किंवा शाह यांनी केले असते तर मोदी भक्तांनी आणि मंत्र्यांनी त्यांना गद्दार ठरवले असते अशी टिका होताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ अंदाजे १० वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे वक्तव्य काँग्रेस पक्ष सत्तेत असताना केले असून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अत्ताचा वाटत असल्याने त्यांनी मोदी समर्थकांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे

अक्षयने कॅनडामधील टोरांटो येथे झालेल्या एका कार्यक्रमात तेथील जनतेला आपण कॅनडाचे नागरिक असून निवृत्तीनंतर आपण येथेच स्थायिक होणार असल्याचे सांगितले. अक्षयचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी त्याला यावरून ट्रोल केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय कुमार टोरांटोमधील एका कार्यक्रमात स्टेजवरून उपस्थित चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. ‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो हे माझे घर आहे. टोरांटो माझे घर आहे. सिनेमामधून निवृत्ती घेतल्यानंतर मी येथे येऊन राहणार आहे.’ असं वक्तव्य अक्षयने या व्हिडीओमध्ये केले आहे. अक्षयच्या या वक्तव्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष करत त्याच्या या निर्णयाचे स्वागत केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भारतातील परिस्थितीबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचावरून वाद सुरु असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांनी अक्षयला या वक्तव्याबद्दल चांगलेच फैलावर घेतले आहे.

फॅक्ट चेक: नक्की कधीचा आहे हा व्हिडीओ आणि अक्षय काय म्हणाला होता

अक्षय कुमारचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असला तरी यूट्यूबवर हा व्हिडिओ १० वर्षांपूर्वीच अपलोड करण्यात आला होता. हा पाहा युट्यूबवरील स्क्रीनशॉर्ट हा व्हिडीओ ३१ जुलै २००८ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट २००८ रोजी प्रदर्शित झालेल्या सिंग इज किंग सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय टोरांटोला गेला होता त्यावेळी त्याने हे वक्तव्य केले होते.

युट्यूबवरील व्हिडीओ

‘सिंग इज किंग’ सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी अक्षय कॅनडाला गेला होता त्यावेळीचा हा व्हिडीओ आहे. अक्षयने एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात स्पष्टिकरण देताना माझे वडील आजारी होते त्यावेळेस त्यांना उपचारासाठी टोरांटोला घेऊन गेलो होतो त्यामुळे या शहराशी माझे खास नाते असल्याचे म्हटले होते.

पत्रकारांनीही केली जुन्या व्हिडीओवरुन मोदींवर टिका

सिनेमांमधून देशभक्तीचे संदेश देणाऱ्या अक्षयच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. विशेष म्हणजे या जुन्या व्हिडीओवरून मोदींवर टिका करणाऱ्यांमध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत पत्रकार असणारे सौरभ शुक्ला म्हणतात, ‘हेच वक्तव्य जर एखाद्या खान किंवा शाह यांनी केले असते तर आत्तापर्यंत भक्तांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्यांना गद्दार म्हटले असते. अनुपम खैर साहेब याबद्दल तुमचे मत व्यक्त करा सर्वजण वाट पाहत आहेत.’

तर यावरच मत व्यक्त करताना स्तंभलेखक असणाऱ्या अभ्यंग प्रकाश यांनी अक्षय कुमार भाजपासमर्थक असल्याने यावरून वाद झाला नाही असे मत व्यक्त केले आहे.

केवळ पत्रकारच नाही तर अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडीओ या वर्षीचा असल्याचे वाटत असून त्यांनीही याचा थेट संबंध मोदी सरकार, असिहिष्णुता आणि नसीरुद्दीन शाह यांच्याशी जोडला आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे

आणि हा देशभक्तीच्या नावाने इथे सिमेंण्टची जाहिरात करतो

आणि आपण नसीरुद्दीन शाह यांना नावं ठेवतोय

याच्यापेक्षा टॉम अल्टर परवडले

सिनेमा येतो तेव्हाच याला देशभक्ती आठवते

पार्ट टाइम देशभक्ती फूल टाइम कमाई

खरा देशभक्त कॅनडाचा…

लगेच निघ

हेच जर खान म्हणाले असते तर

तुम्ही आमच्या कानशिलात लगावली

भारतीय संघाला तुमच्यासारख्यांची गरज आहे

अक्षयला तिकीट काढून देणार का?

एकंदरितच या ट्विटखाली अनेकांनी अक्षय कुमारवर टिका केली असून तो खोटा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. त्याची देशभक्ती फक्त सिनेमापुरती मर्यादीत असून सिनेमे भारतीयांना विकून तो केवळ पैसे कमतो असा आरोप ट्विपल्सने केला आहे. पण हा व्हिडीओ दहा वर्ष जुना असून मुद्दाम खोडसाळपणा करण्यासाठी तो व्हायरल केला जात आहे हे नेटकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

Story img Loader