Mumbai boat accident Fact Check Video :  विश्वास न्यूज : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीबरोबर एक भीषण दुर्घटना घडली होती. अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शकडो प्रवाशांनी भरलेली प्रवासी बोट खोल समुद्रात बुडाली, ज्यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली प्रवासी बोट बुडताना दिसत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेचा आहे, ज्यात बोट बुडाल्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. दरम्यान, विश्वास न्यूजने हा व्हिडीओ खरंच मुंबई बोट दुर्घटनेचा आहे का? याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

‘mumbai.hai.hai नावाच्या इन्स्टाग्राम युजरने १९ डिसेंबर २०२४ रोजी व्हायरल व्हिडीओ (आर्काइव्ह लिंक) शेअर केला आणि लिहिले की, “अलिबागहून गेट वे ऑफ इंडियाला येताना बोट उलटली.”

https://perma.cc/DVW9-MC5V

तपास:

तपास सुरू करण्यासाठी आम्ही या व्हिडीओचे कीफ्रेम गूगल लेन्सवर सर्च केले. यावेळी आम्हाला हा व्हिडीओ न्यूज एजन्सी असोसिएट प्रेसच्या यूट्यूब चॅनेलवर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळले. यासह लिहिले होते, अनुवादित: “काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकमधील किवू तलावामध्ये शेकडो लोकांनी भरलेली बोट उलटून किमान ७८ जणांचा मृत्यू झाल्याचे लाईव्ह फुटेज एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केले.”

आम्हाला चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आफ्रिका (China Global Television Network Africa) च्या यूट्यूब चॅनेलवरदेखील व्हायरल व्हिडीओ सापडला. येथेही तो काँगोमध्ये घडलेल्या घटनेचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर आम्ही मुंबई बोट अपघाताचे व्हिडीओ शोधले. आम्हाला या घटनेचे अनेक व्हिडीओ आढळले, जे व्हायरल व्हिडीओपेक्षा पूर्णपणे भिन्न होते.

अधिक माहितीसाठी आम्ही मिड डेचे वरिष्ठ रिपोर्टर समिउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा व्हायरल व्हिडीओ मुंबई बोट दुर्घटनेच्या घटनास्थळाचा नाही.

हा व्हिडीओ गोव्यातील असल्याचा दावा करून तो यापूर्वीही एकदा व्हायरल करण्यात आला होता, त्यावेळी देखील विश्वास न्यूजने याची चौकशी केली होती. ते फॅक्ट चेक येथे वाचता येईल.

https://www.vishvasnews.com/viral/fact-check-this-video-going-viral-in-the-name-of-goa-is-of-a-boat-accident-in-congo/

खोटा दावा करून व्हायरल व्हिडीओ शेअर करणाऱ्या mumbai.hai.bhai_ या युजरचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक युजर्स फॉलो करतात.

निष्कर्ष : विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. काँगोमधील बोट दुर्घटनेचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेचा असल्याचा भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.

(ही कथा मूळतः विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)

https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-this-video-which-is-going-viral-in-the-name-of-mumbai-boat-accident-is-from-congo/?utm_source=homepage&utm_medium=dktp_s1&utm_campaign=editorpick

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check viral video claiming to show mumbai boat accident passenger ferry capsizing is actually from congo sjr