मार्च महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक थंड पाण्याशिवाय कोल्ड्रिंक्सला पसंती देत आहेत. त्यासाठी बाजारपेठांमध्येही विविध कोल्ड्रिंक्स ब्रॅण्डच्या बाटल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, तुम्हीदेखील उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कोल्ड्रिंक्स पित असाल ना? पण, हे कोल्ड्रिंक्स कसे बनवले जाते ते तुम्हाला माहीत आहे का? सध्या सोशल मीडियावर कोल्ड्रिंक्ससंदर्भात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात नकली कोल्ड्रिंक कसे बनविले जाते आणि ते बाजारात बनावट पॅकिंग करून कसे विकले जाते हे दाखविण्यात आले आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक टब बनावट कोल्ड्रिंकने भरलेला आहे. त्यावेळी एक व्यक्ती भेसळयुक्त कोल्ड्रिंक कोका कोलाच्या बाटल्यांमध्ये भरत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाबमधील असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडीओ @KALIYUG_WALE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कोका कोलाच्या नावाखाली लोकांना विष विकले जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी, म्हणून मी कोका कोला नाही, तर ताक पितो, असे म्हटले. यात काहींनी म्हणून कोल्ड्रिंक्स पिणेच बंद केल्याचे म्हणत संबंधित लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.