नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्याचवर्षी ५०० आणि २ हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. आता यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) २०० रुपयांची नोट चलनात आणण्याची तयारी करत आहे अशी चर्चा आहे. त्यातून नव्या २०० रुपयांच्या नोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हे फोटो फॉरवर्ड करण्यात आल्याचे समजत आहे. पण हे नव्या नोटांचे फोटो नसून ते फॉटोशॉप करण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर्षी जूननंतर २०० रुपयांच्या नोटा आणण्य़ाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने २०० रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांगितली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लाइव्ह मिंट’ने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. आरबीआयला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जूननंतर २०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या नोटांची छपाई होण्याआधीच त्यांचे फोटोशॉप केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाचशे आणि २ हजारांच्या नव्या नोटा चलनात येण्याआधीही त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या नोटांमध्ये चीप बसवल्या असल्याच्या अनेक अफवा तेव्हा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. जर २०० रुपयांची नोट बाजारात आली तर २ हजार रुपयांच्या नोटांनंतर बाजारात येणारे हे दुसरे नवे चलन असेल. पण तुर्तास तरी व्हायरल झालेले हे फोटो खोटे आहेत.