सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओही व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.
ट्रेनमधून प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करायचा हा नियम सगळ्यांनाच माहीत आहे. विनातिकीट प्रवास केल्यावर दंड भरावा लागतो आणि या दंडापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना दिसतात. ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास केला, तर टीसी येण्याची सगळ्यांनाच भीती असते. पण, जर हा टीसीच नकली असला तर… सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं प्रकरण काय, ते जाणून घेऊ….
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी ट्रेनमध्ये तिकीट चेक करण्यासाठी आलेली दिसतेय. तिकीट चेकर आहे, असं सांगून ती सगळ्यांना आपल्या तिकीट दाखविण्यासाठी आग्रह करताना दिसतेय. पण, तिला बघताच अनेकांना कळलं की, ही नकली टीसी आहे. त्यावर आवाज उठविण्यासाठी एका माणसानं तिला विचारलं, “तुमचा आयडी नंबर काय आहे?” यावर तिनं लक्ष दिलं नाही आणि ती गोष्टी टाळत गेली.
आयडी कार्ड नाही बोलल्यावर “जॉब नंबर काय आहे तुमचा?” असं ट्रेनमधील एका माणसानं तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली, “मी नाही सांगू शकत.” आता चेकिंग सुरू आहे. तुमच्याकडे तिकीट नाहीय तर काहीच प्रॉब्लेम नाहीय.”
तिकीट नाहीय आणि त्याचा काही प्रॉब्लेम नाही, असं टीसी म्हणतोय हे ऐकल्यावर, “तुम्ही टीसी आहात ना,” असा प्रश्न एकानं विचारला. तर त्यावर उडवाउडवीची उत्तरं देत ती म्हणाली, “मला मॅडमनं पाठवलं आहे.” सगळेच तिला प्रश्न विचारत, तिची शाळा घेतायत हे कळल्यावर ती एकाला म्हणते, “तुम्ही पुढच्या स्थानकावर उतरा.”
हा व्हिडीओ @daily_24hour या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला ‘ट्रेनमध्ये नकली तिकीट चेकर’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.