तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता एखाद्या गोष्टीच्या प्रसिद्धीसाठी अथवा जाहिरातीसाठी पोस्टरवर किंवा भिंतीवर हाताने चित्र काढायचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्याची जागा आता आधुनिक यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे सत्तरीच्या दशकात या क्षेत्राला मिळणारा प्रतिसाद सध्याच्या घडीला मिळत नाही. बदलत्या परिस्थितीनुसार अनेकांनी कलेचं हे क्षेत्र बदलणेच पसंत केले. मात्र, दापोडीतील एका कुटुंबाने नवा व्यवसाय उभारुन चित्रकलेचा वारसा जपला आहे. या कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी तिघांनी मिळून चित्रकलेचा वारसा डिजिटल युगातही जपून ठेवलाय. अकबर शेख, मुलगा शाहनवाज शेख आणि मुलगी सलमा शेख अशी या चित्रकारांची नावे आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने चित्रकला जगवत आहेत.

अकबर शेख यांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून चित्र काढण्यास सुरुवात केली. आज वयाच्या ६६ वर्षानंतरही त्यांच्यात पूर्वीसारखाच उत्साह आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. पण कमी शिक्षण असल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर एका नामवंत कंपनीत त्यांनी ६ रुपये ५० पैसे या रोजंदारीवर दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी ब्रश आणि कलरचा डबा हाती घेतला. शाळेतील भिंतीवरील चित्रे, ट्रकचे पेंटिंग करणं, गणपती उत्सवात लाकडी प्लायवूडवर निसर्ग चित्र काढण्यास सुरुवात केली. १९७० च्या दशकात १०० रुपये मानधन घेऊन ते गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यात रंग भरायचे. अनेक शाळेत त्यांनी रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची हुबेहूब चित्र साकारली आहेत. ही चित्रे डिजिटल युगातील फलकांना लाजवतील अशीच आहेत.