Farewell Ceremony Shocking Video : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्या की, प्रत्येक शाळेत ‘या’ विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल पार्टीचे आयोजन केले जाते; ज्यासाठी सर्वच विद्यार्थी फार उत्सुक असतात. पण, हे सर्व करत असताना मनात शाळेबद्दलच्या अनेक आठवणी दाटून येतात. नवीन कॉलेजमध्ये जाण्याचे औत्सुक्य असते; पण ज्या शाळेत आपण शिकलो, खूप मज्जामस्ती केली, जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी बनवल्या, त्या आता रोज भेटणार नाहीत याचे कित्येकांना वाईटही वाटते. पण, फेअरवेल पार्टीच्या निमित्ताने का होईना वर्गातील मित्र-मैत्रिणींना शेवटचे एकत्र भेटता येते. यावेळी आठवणींबरोबर भेटवस्तूंचीही देवाण-घेवाण होते. शिक्षक आणि शाळेसाठी काही विद्यार्थी खास भेटवस्तू देतात. मात्र, हरिद्वारमधील एका शाळेत ज्या प्रकारे फेअरवेल पार्टी झाली ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या फेअरवेल पार्टीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, हे शाळेतील विद्यार्थी आहेत की रस्त्यावरील गुंड…
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका प्रतिष्ठित शाळेतील १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने काही विद्यार्थी हरिद्वारजवळील भेल स्टेडियमवर जमले होते, जिथे काही विद्यार्थी शाळेच्या मैदानात कारबरोबर धोकादायक स्टंटबाजी करीत होते; तर एक विद्यार्थी चक्क हवेत गोळीबार करताना दिसला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी ७० अनोळखी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शाळेतील फेअरवेल पार्टीतील धक्कादायक व्हिडीओ
m
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मोकळ्या मैदानात मोठ्या संख्येने विद्यार्थी सूट-बूट घालून फेअरवेल पार्टीसाठी एकत्र आले आहेत. मैदानात अनेक महागड्या गाड्यांची रांग लागली आहे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. यावेळी काही विद्यार्थी चक्क कारसह स्टंटबाजी करत आहेत; तर एक विद्यार्थ्यी चक्क सर्वांसमोर हवेत गोळीबार करतोय. इतकेच नाही, तर काही विद्यार्थी कारच्या छतावर उभे राहून या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतायत. हे सर्व विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहेत.
दरम्यान, या फेअरवेल पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २२३, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओच्या आधारे विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
“व्वा, हे आहे देशाचे भविष्य”, युजर्सच्या कमेंट्स
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपापली मते मांडली आहेत. एका युजरने लिहिलेय की, व्वा, हे आहे देशाचे भविष्य. तुम्ही योग्य दिशेने जात आहात. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, या १५-१७ वर्षांच्या मुलांना बंदुका कोणी दिल्या; त्याला आधी अटक करा. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, प्रत्येकाची ओळख पटली पाहिजे आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवरही कारवाई केली पाहिजे.