प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भारताबरोबरच अरब देशांकडूनही निषेध नोंदवला जात असतानाच अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनेही यासंदर्भात मोजक्या शब्दांमध्ये एक सूचक ट्विट केलंय. अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला़ त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपाला कारवाई करावी लागली, असतानाच आता फरहाननेही यावरुन अप्रत्यक्षपणे भाजपाबरोबरच या दोन्ही प्रवक्त्यांना टोला लगावलाय. मात्र त्याचवेळी काहींनी या ट्विटचा संबंध फरहानच्या डॉन थ्री या चित्रपटाशी जोडलाय.
नेमकं घडलं काय?
एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली़ शर्मा यांना पक्षाने निलंबित केले. सर्व धर्मांबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणे पक्षाला मान्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपाने रविवारी देत या प्रवक्त्यांना निलंबित केलं. या प्रकरणानंतर दोन्ही प्रवक्त्यांनी माफी मागितली असून आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदार असल्याचं सांगितलं.
फरहानचं सूचक वक्तव्य
हा सारा प्रकार काल घडत असतानाच फरहान अख्तरने रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये मात्र कोणाचाही थेट उल्लेख न करता एक ट्विट केलंय. यामध्ये त्याने माफी मागताना ती मनापासून मागितली पाहिजे अशा आशयाचा मजकूर पोस्ट केलाय. “बळजबरीने मागण्यात आलेली माफी ही कधीच मनापासून मागितलेली नसते,” असं फरहान म्हणालाय. सध्या त्याचं हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
एकीकडे ही अप्रत्यक्षपणे प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भातील वादावरील प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे काहींनी याचा संबंध फरहानच्या ‘डॉन थ्री’ या चित्रपटाशी जोडलाय. फरहानने नुकतेच आपण डॉन थ्रीच्या लिखाणासंदर्भातील काम हाती घेतल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. त्यामुळे ही पोस्ट नेमकी सध्याच्या घडामोडींवर आहे की त्या लिखाणाचा एक भाग आहे याबद्दलही त्याच्या समर्थकांमध्ये संभ्रम आहे. असं असलं तरी या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काही मोजक्या प्रतिक्रिया पाहुयात…
१)
२)
३)
४)
५)
या प्रतिक्रियांवरुन दोन्ही बाजूचे म्हणजेच फरहानला समर्थन करणारे आणि विरोध करणारे त्याच्या या ट्विटवर व्यक्त होताना पहायला मिळत आहे.
अरब देशांची नाराजी
या प्रकरणी इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केले. अरब देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीबद्दल एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला. कतारच्या परराष्ट्र विभागाने रविवारी सांगितले की, भारतात भाजपनेत्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विचारणा करण्यासाठी आम्ही भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना पाचारण केले होते. या पूर्णत: अस्वीकारार्ह, निषेधार्ह विधानाबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. धार्मिक व्यक्तीमत्त्वांबाबत भारतातील काही व्यक्ती अवमानकारक वक्तव्ये करीत असल्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही चिंता व्यक्त केली आहे. यावर भारतीय राजदूतांनी स्पष्ट केले की, ही विधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे मत नाही, तर ती काही दुय्गम घटकांचे मत आहे. भारतीय परंपरेनुसार भारत सरकार सर्वच धर्मपंथांचा सन्मान करते. अशा विधानांबाबत संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले. भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत.