‘गरज ही शोधाची जननी असते’ या उक्तीची साक्ष अनेकदा विविधांगी घटनांवरून अनुभवायला मिळते. काही वर्षापासून शेतकरी अनेक संकटांचा सामना करत शेती करतोय. करोनामुळे एकीकडे मजुर मिळत नाही तर दुसरीकडे हातात पैसे नसल्याने महागडी यंत्र वापरता येत नाही. पण एखाद्या अडचणीवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर त्यात यश मिळते याची अनुभूती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील तरुण शेतकऱ्याची जुगाड टेक्नॉलॉजी सध्या चर्चेचा व औत्सुक्याचा विषय बनली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही देखील या जुगाडाच्या प्रेमात पडाला.
शेती व्यवसाय दिवसागणिक विविध कारणांमुळे संकटात येत आहे. पावसाचा लहरीपणा, दुष्काळ, मजुरांची चणचण, वाढती मजुरी, बैल जोडीचा खर्च न परवडणे रोगराईचा प्रादुर्भाव, विजेचा लपंडाव, शेतीमालाला हमीभाव न मिळणे व नुकसान भरपाईची केवळ आश्वासने अशा एक ना अनेक समस्यांमध्ये बळीराजा गुरफटला असून खरीप व रब्बी उत्पादनासाठी खंबीरपणे उभे राहणे देखील शेतकऱ्यांना अशक्य होत असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. पण या सगळ्या संकटावर मात करत तरूण शेतकऱ्याने एक अनोखी शक्कल लढवलीय. या तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतातली नांगरणी करण्यासाठी कोणत्याही ट्रॅक्टर किंवा बैलगाडीचा वापर केलेला नाही. तर चक्क बाईकनेच आपल्या शेतीची नांगरणी केलीय. हा व्हिडीओ पाहून बडेबडे टेक्नॉलॉजिस्ट देखील अवाक झाले आहेत.
बाईकची मदत घेऊन एका दिवसात बरीच मोठी जमीन नांगरता येणं शक्य करून दाखवलंय. बैलही एवढे काम करु शकत नाहीत. यामुळे खर्चही कमी येतो. पाच एकर शेतीचे क्षेत्र वखरणीसाठी बैल जोडीला एक दिवस लागतो, परंतु बाईकच्या माध्यमातून हे काम अवघ्या चार- पाच तासात पूर्ण होते. बाईकला मागे नांगरणीच्या साहित्याची जोडणी करून त्याआधारे चांगल्या पद्धतीने नांगरणी करण्याचा प्रयोग या तरूण शेतकऱ्याने यशस्वी केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, तरुणाने आपल्या बाईकच्या मागे दोन चाकांना एक छोटा नांगर जोडलेला आहे. शेतात बाईक चालवत असताना त्याच्या मागे ते नांगरही पुढे येताना दिसून येतंय. हा व्हिडीओ jugaadu_life_hacks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.
बैलजोडी बाळगणे शेतकऱ्यांना हल्लीच्या काळात आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने तसेच ट्रॅक्टरचा खर्चही झेपत नसल्याने हा देसी जुगाड हल्लीच्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा आहे. तरूण शेतकऱ्याने केलेला हा टेक्नॉलॉजीचा जुगाड पाहून सोशल मीडियावर त्यांच भरपूर कौतुक करण्यात येतंय. लोकांना हा गमतीदार व्हिडीओ खूप आवडला आहे. लोकं हा व्हिडीओ नुसता एकमेकांसोबत शेअरच करत नाहीत, तर त्यावर लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स देखील करत आहेत. या व्यक्तीचा जुगडा सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडला आहे त्यामुळे लोकं याचे कौतुक केल्याशिवाय स्वत:ला थांबवू शकत नाहीत.