प्रवास म्हटलं की त्यामध्ये जाणारा वेळ आपसूकच आला. मात्र हाच प्रवास कमीत कमी वेळ घेणारा आणि जास्तीत जास्त वेगवान असेल तर? याच उद्देशाने चीनमध्ये एक नवीन बुलेट ट्रेन सुरु करण्यात आली आहे. फुक्सिंग नाव असलेल्या या बुलेट ट्रेनचे नुकतेच उद्घाटन झाले असून ती नागरिकांना वापरण्यासाठी खुली करण्यात आली आहे. या ट्रेनचा वेग ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. या ट्रेनचा वेग ताशी ४०० किलोमीटर इतका आहे. त्यामुळे एका तासाला इतके अंतर कापणारी ही ट्रेन खऱ्या अर्थाने वेगवान ठरणार आहे.
ही ट्रेन संपूर्णपणे स्वदेशी असून, सध्या ती बीजिंग ते शांघाय या मार्गावर धावणार आहे. रविवारी ११.०५ वाजता बीजिंगवरुन शांघायच्या दिशेने निघालेली ही ट्रेन अवघ्या ५ तास ४५ मिनिटांत शांघायला पोहोचली. प्रवासादरम्यान ही ट्रेन एकूण १० स्टेशनवर थांबली. या नव्या ट्रेन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिटवर चालणाऱ्या असून ताशी ३५० किलोमीटर या वेगाने त्या धावणार आहेत. मात्र ताशी ४०० या वेगानेही त्या धावू शकतात. बीजिंग-शांघाय या मार्गावर दररोज जवळपास ५ लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. त्यामुळे या बुलेट ट्रेनचा वापर या मार्गावर करण्यात आला आहे.
ट्रेनच्या नियमित कामगिरीचे रेकॉर्ड राहील, अशी वेगळी यंत्रणा या ट्रेनमध्ये लावण्यात आली आहे. याबरोबरच आपतकालिन स्थितीमध्ये ट्रेन स्वतःहून आपला वेग कमी करेल अशीही यंत्रणा यामध्ये आहे. याशिवाय ट्रेनमध्ये वाय-फाय आणि पॉवर सॉकेटस देण्यात आले आहेत. याविषयी बोलताना चीन रेल्वे कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर लू डोंगफू म्हणाले, चीनच्या अर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया रचण्यात फुक्सिंग ट्रेनचे मोठे योगदान असून, चीनच्या बुलेट ट्रेनला या ट्रेनमुळे एक नवा आयाम मिळाला आहे. चीनमध्ये जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे असून हे जाळे १,२२,००० किलोमीटरवर पसरले आहे. हे प्रमाण जगातील एकूण रेल्वेमार्गापैकी ६० टक्के इतके आहे.