सोशल मीडियावर काही फोटो वेगाने व्हायरल होत असतात. फोटो पाहिल्यानंतर त्यातील भावना हृदयाला भिडतात. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत असून नेटकऱ्यांची दाद मिळत आहे. व्हायरल फोटोतील एक व्यक्ती आपल्या मुलीसोबत खेळत आहे. तिला प्रेमाने जवळ घेतलं आहे. पण फोटो पाहिल्यानंतर मुलगी आणि वडिलांची हेअरस्टाइल नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघांच्या डोक्याला टाके लागल्याचं दिसत आहे. दोघांवर शस्त्रक्रिया झाल्याचं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. वडिलांच्या कृतीचे तुम्हीही कौतुक कराल यात शंका नाही.
लहान मुलीची ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. पण मुलीला याबाबतची जाणीव होऊ नये, यासाठी वडिलांनी खास तिच्यासारखी हेअरस्टाईल केली आहे. वडिलांचं मुलीप्रती प्रेम पाहून नेटकऱ्यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हायरल फोटो TheFigen या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या लहान मुलीची ब्रेन सर्जरी झाली आहे. तिला कोणत्याही वेदना जाणवू नये यासाठी वडिलांनी तिच्यासारखी हेअरस्टाइल केली आहे.
हा फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या फोटोखाली हजारो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘शेवटी बाप बाप असतो. मुलीसाठी इतकं तर करूच शकतो’. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘वडिलांच्या अशा कृतीने मुलीला वेदना जाणवणार नाहीत. कारण वडिलांचं प्रेम त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.’