Viral Rickshaw Father Emotional Quote Video : रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षावर, टॅक्सी किंवा बाईक्सच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तसेच प्रश्नही पडतो की, या लोकांना एवढं भन्नाट लिहायला सुचत कसं… पण काहीवेळी रिक्षा किंवा काही वाहनांच्या मागे असे काही कोट्स लिहिलेले असतात जे फार भावनिक असतात किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील व्यक्तींबरोबरच्या आठवणी ताज्या करतात. त्यामुळे असे कोट्स नेहमीच लोकांचेही लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एका रिक्षावरील कोट्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो वाचून अनेकजण आपल्या वडिलांच्या आठवणीने भावूक झाले आहेत. तर काहींना वडिलांबरोबरच्या आठवणी आठवून अश्रू अनावर होत आहेत. नेमकं या कोट्समध्ये असं काय लिहिलं आहे जाणून घेऊ…
रिक्षाचालकाने असं नेमकं लिहिलंय तरी काय?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईच्या रस्त्यावरुन काळ्या – पिवळ्या रंगाची एक रिक्षा वेगाने जात आहे. यावेळी रिक्षाच्या मागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने त्या रिक्षाच्या मागे लिहिलेला काळजाला भिडणारा आणि बाबांच्या आठवणीने डोळ्यातून टचकन पाणी आणणारा सुंदर मेसेज व्हिडीओत कॅप्चर केला आहे. जो वाचल्यानंतर अनेकांना आपल्या वडिलांची आठवण आली. काहीजण तर खूपचं भावूक झाले. आता तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकाने असं नेमकं लिहिलंय तरी काय?
“वडील म्हणजे साक्षात देव”
रिक्षा चालकाने रिक्षाच्या मागील बाजूला छोट्या खिडकीच्यावरती बापाविषयी एक काळजाला भिडणारा मेसेज लिहिलाय. “कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप…” यातून त्याने वडिलांनी लहानचं मोठं होईपर्यंत तु्म्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुमचे लाड हट्ट, इच्छा पुरवल्या, तो वडील म्हणजे साक्षात देव आहे, त्यामुळे देवाऱ्यातील देवाला पूजण्याआधी जन्मदात्या बापाची सेवा करा असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या रिक्षाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
me_ashi_kashi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझे बाबा नेहमीच मुलांच्या प्रेमापोटी माघार घेतात,पण नंतर समजुनही सांगतात.
रिक्षा चालकाने वडिलांसाठी रिक्षावर लिहिलेल्या भावनिक ओळी
“जगात निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बाबा” युजर्सच्या भावनिक कमेंट्स
अशाप्रकारे अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये भावनिक कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच आपल्या आयुष्यतील बाबांचे स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे. एकाने आपल्या बाबांसाठी लिहिलेय की, “आमच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा, कधीच काही कमी पडू न देणारा श्रीमंत माणूस”, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कठीण परिस्थितीत सर्वात आधी आठवणारी व्यक्ती म्हणजे बाप”, तिसऱ्या एका युजरने लिहिले की, “वडिलांबद्दल काय लिहायचं ओ? त्यांचं प्रेम समजायला आयुष्य पण कमी आहे”.
चौथ्या एकाने लिहिले की, “बाप म्हणजेच जग आणि जग म्हणजेच बाप”, पाचव्या एकाने लिहिले की, “जगात निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती बाबा”. शेवटी एकाने आपल्या बाबांविषयी सांगताना लिहिले की, “काही वादामुळे नवऱ्याचं घरं सोडून आल्यावर भावजयला माझ्या बाबांनी ठणकावून सांगितलं “ही माझी लेक आहे माझा घरात राहणार, बाबा”, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या बाबांसाठी एका ओळीत लिहायला सांगितलं तर काय लिहाल आम्हाला कमेंटमध्ये कळवा.