शाळेतील इतर मुलींना त्रास दिल्यामुळे सस्पेंड करण्यात आलेल्या मुलीला एका व्यक्तीने वेगळ्या पद्धतीने धडा शिकवला आहे. मुलीला आपली चूक लक्षात यावी यासाठी वडिलांनी तिला पाच किमी पायी चालत शाळेत पोहोचण्याची शिक्षा दिली. या व्यक्तीने याचा व्हिडीओ शूट केला असून तो फेसबुकवर अपलोड केला आहे. ओहिओ येथे ही घटना घडली आहे.
मॅट कॉक्स असं या व्यक्तीच नाव आहे. मॅट कॉक्स यांची 10 वर्षांची मुलगी क्रिस्टन हिला दोन वेळा इतर विद्यार्थिनीला त्रास दिल्या कारणाने स्कूल बसमधून बाहेर काढण्यात आलं होतं. यामुळे मॅट यांना तिला आपल्या गाडीतून शाळेत सोडायला जावं लागत होतं. मुलीला धडा शिकवण्यासाठी ही योग्य संधी असल्याचं त्यांनी ओळखलं.
फेसबुक व्हिडीओत ते बोलताना दिसत आहेत की, इतरांना त्रास देणं स्विकारलं जाऊ शकत नाही. किमान माझ्या घरात तर नाहीच नाही.
‘अनेक मुलांना वाटतं की आई-वडील आपल्यासाठी जे करतात ते केलंच पाहिजे, ते काही उपकार करत नाहीत. उदाहरणार्थ सकाळी शाळेत आपल्या मुलांना सोडणे किंवा सकाळी स्कूल बसची सुविधा उपलब्ध करुन देणे. या सर्व सुविधा असून त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्यामुळेच मी आज माझ्या सुंदर मुलीला पाच किमी चालण्यास लावत आहे’, असं कॉक्स यांनी सांगितलं आहे.
व्हिडीओत क्रिस्टन रस्त्याच्या कडेला चालत असून मॅट तिला गाडीतून फॉलो करत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी वडिलांनी मुलीला दिलेल्या या शिक्षेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी इतकी कठोर शिक्षा देण्याची काही गरज नव्हती असं मत नोंदवलं आहे.
पालकांनी आपल्या मुलांना जबाबदार धरलं पाहिजे. इतरांप्रमाणे मुलं लहान असतात त्यामुळे त्यांच्या चुका माफ करणारा पालक मी नाही असं मॅट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.