चीनमधील एक बाप आपल्या मुलीला घेऊन रोज कबरीत झोपतो. हे वाचून तुम्हाला काहीसे आश्चर्य वाटले असेल. मात्र त्या बापाची करुण कहाणी ऐकून तुमचे मन नक्कीच हेलावून जाईल. आपल्या मुलीवर असणाऱ्या प्रेमापोटी हे वडिल हा मार्ग अवलंबत आहेत. झांग लियोंग आणि डेंग यांच्या दोन वर्षांच्या जिनली या मुलीची ही करुण कहाणी अंगावर शहारा आणणारी अशीच.
जिनली एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. मोठी झाल्यावर आपल्या मुलीला मृत्यूची भीती वाटू शकते. तसे होऊ नये यासाठी मी तिला आतापासूनच कबरीत घेऊन झोपतो असे झांग लियोंग यांनी इंडिपेंडंटला माहिती देताना सांगितले. आपल्या मुलीवर बापाचे असणारे प्रेमच यातून दिसून येते. ज्याच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण दुखः आणि भीतीमध्ये पाहू शकत नाही. विशेषतः एका बापासाठी हा अतिशय अवघड क्षण असतो. त्यामुळे मी आतापासूनच काळजी घेत असल्याचे लियोंग म्हणाला.
आपल्या घराच्या अंगणातच लियोंग याने कबर खणली आहे. दिवसभरात वेळ मिळाला तर तो आपल्या या चिमुकलीला घेऊन याठिकाणीच झोपतो. आपल्या पत्नीलाही तो अनेकदा म्हणतो, कधी जर तिला याठिकाणी एकटीला रहावे लागले तर तिला भीती वाटायला नको. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे जोडपे आणखी एका बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहेत. या बाळाच्या नाळेतील स्टेमसेल्सपासून जिनलीवर उपचार करता येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.