सोशल मीडियावर मुलं आणि पालकांशी सबंधित अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. यामधील काही पोस्ट भावनिक असतात तर काही मजेशीर. पालक आपल्या मुलांच्या लहानपणापासून ती मोठी होईपर्यंतच्या अनेक अपेक्षा, गरजा पुर्ण करत असतात. शिवाय तिच मुलं मोठी झाली की त्यांच्याकडून पालक काही अपेक्षा ठेवतात. पण आपण मुलांची जशी काळजी घेतली त्याच पद्धतीने त्यांनी देखील आपली काळजी घ्यावी अशी पालकांची अपेक्षा असते. पण काही कामांमुळे तर कधी धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे अनेकदा मुलं इच्छा असतानाही पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत, काळजी घेत नाहीत असं वाटतं आणि मग भावनिक ड्रामा सुरू होतो. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलीने वडिलांनी सांगितलेली काम न केल्यामुळे त्यांनी एक भावनिक स्टेटस ठेवला आहे. ज्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण –
खरं तर, या प्रकणात एका मुलीला तिच्या वडिलांनी Instamart वरून फळे ऑर्डर करायला सांगितली होती. पण कामाच्या गडबडीत ती फळे ऑर्डरायला विसरली आणि तेवढेच तिच्या वडिलांच्या मनाला लागलं. त्यामुळे आपल्या मनातील भावना त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे व्यक्त केल्या. वडिलांच्या याच स्टेटसचा फोटो मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात स्विगीने देखील उडी घेतली, त्यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन भावनिक, परंतु मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.
मुलीने ट्विटरवर वडिलांचा स्टेटस अपलोड केला –
मुलीने तिच्या वडिलांचा स्टेटस ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘वडिलांनी मला इंस्टामार्टवरून फळे ऑर्डर करायला सांगितले आणि मी ते विसरले. त्यामुळे त्यांनी काय स्टेटस ठेवला आहे पाहा.” वडिलांनी ठेवलेल्या स्टेटसच्या फोटोमध्ये लिहिलं आहे, “जगाकडे काय तक्रार करायची साहेब, आमचीच मुले आम्हाला साथ देत नाहीत.” तर केवळ फळांची ऑर्डर न दिल्याने वडील इतके दुखावले गेले असतील इतर दिवशी ते काय करत असतील याची कल्पना करु शकत नाही असं काही नेटकरी म्हणत आहेत.
स्विगीनेही दिली प्रतिक्रिया –
वडिलांनी टाकलेला हा स्टेटस मुलीला मजेदार वाटला त्यामुळे तिने सोशल मीडियावर तो पोस्ट केला. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत, शिवाय वडील किती भावनिक आहेत असं ते म्हणत आहेत. या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत असताना स्विगीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ‘सह लेंगे थोडा सा’ असे लिहिलं आहे. या कमेंटवरही लोक खूप हसत आहेत. तर अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.