हल्ली तरुणांनाच नाही, तर लहानांपासून मोठ्यांनाही रील्सचं एवढं वेड लागलं आहे की, ते कुठेही जाऊन काही करायला तयार असतात. लोक कधी गर्दीत, तर कधी अतिशय धोकादायक ठिकाणी उभं राहून रील्स शूट करीत असतात. अगदी आपण काय खातो, कुठे फिरतो, काय कपडे घालतो, मेकअप कसा करतो अशा अनेक गोष्टींचे रील्स लोक शेअर करीत असतात. पण, काही वेळा लोकांच्या रील्स व्हिडीओंमुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारे इंडिगो फ्लाइटमधील एका महिलेचा एक रील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यात ती महिला भर फ्लाइटमध्ये प्रवाशांसमोर चक्क नाचताना दिसतेय. तिच्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काळी साडी नेसलेली एक महिला विमानातील पॅसेजमध्ये आरामात नाचत आहे. ए.आर. रहमान व एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या ‘स्टाईल स्टाईल’ गाण्यावर ती नाचतेय. विशेष म्हणजे फ्लाइट प्रवाशांनी पूर्ण भरलेली आहे; पण तरीही कोणी आपल्याकडे बघतंय, बघून हसतंय याचा विचार न करता, ती आपल्याच धुंदीत नाचतेय. प्रवाशांसमोर वेगवेगळ्या डान्सच्या स्टेप्स करून दाखवतेय. जेव्हा इतर प्रवाशांनी तिला पाहिले तेव्हा फ्लाइट क्रूने ‘ओव्हरहेड बिन’ बंद केला.
salma.sheik.9216 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे; जो व्हायरल झाल्यापासून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले, “प्रवाशांना खूप लाज वाटत होती… पण असा मूर्खपणा करायला हे त्या महिलेचे पर्सनल विमान नव्हते…” दुसऱ्या युजरने लिहिले, “उड्डाणांना उशीर होण्यामागे हेच कारण…”
तिसऱ्या युजरने लिहिले, “हा व्हिडीओ खूप घाणेरडा आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करायला लाज वाटत नाही का? मला कळत नाही की, मी तिच्या धाडसीपणाबद्दल कौतुक करावं की तिच्या रीलची खिल्ली उडवावी.” आणखी एक युजर म्हणाला, “हॅलो, लोकांना त्रास देणं थांबवा, हे तुझं घर नाही.”
शेवटी एक युजर म्हणाला, “म्हणजे आता फ्लाइटमध्येही हे घडतं? मला वाटलं की हे फक्त ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रेन्समध्येच घडतं.”