आजही आपल्या देशात खेळातही करिअर घडवता येऊ शकतं, यावर पालकांचा विश्वास नाही. मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी त्यातून भविष्यात त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेलच असं नाही. त्यामुळे मुलांच्या चिंतेने काही पालक त्यांना वेगळ्या वाटेवरून जाण्यास रोखतात. मुलगा हुशार असेल तर काही पालकांचा विरोध अधिकच तीव्र होत जातो. हुशार मुलांनी अभिनय, क्रीडा, कला क्षेत्रात करिअर घडवण्यापेक्षा बँकिंग, इंजिनिअर, डॉक्टर अशा क्षेत्रात करिअर घडवावे, असा पालकांचा अट्टहास असतो. ‘फिफा U17’ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणारा गोलकिपर धीरज सिंह सोबत असं घडलं होतं. धीरज शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी होता, त्यामुळे फुटबॉल खेळण्याऐवजी त्यांनी शिकून दुसऱ्या क्षेत्रात करिअर घडवावं, असा त्याच्या आई वडिलांचा अट्टहास होता. त्याच्या फुटबॉल खेळण्याला दोघांनीही तीव्र विरोध केला. शेवटी धीरच्या जिद्दीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली.
एक वडापाव मदतीसाठी!, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम
नुकत्याच झालेल्या सामन्यात धीरजचे आई वडील देखील उपस्थित होते. आपल्या मुलावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहून त्यांनाही आनंद झाला. ‘पीटीआय’शी बोलताना त्यांनी धीरजला फुटबॉल खेळण्यासाठी विरोध केल्याचं खुल्या मनानं मान्य केलं. ‘धीरज खूप हुशार आहे. अभ्यासाबरोबरच तो चित्रकला, नाटकातही सहभागी व्हायचा, त्याने शिकून खूप मोठ व्हावं, अशी आमची इच्छा होती. त्याच मन अभ्यासापेक्षा फुटबॉलमध्ये अधिक गुंतलं आहे हे समजल्यावर आम्ही त्याला ओरडलो, विरोध केला. या खेळात तुझं करिअर होऊ शकत नाही हे त्याला वारंवार समजावलं, पण तो काही आमचं ऐकला नाही. त्याच्या भविष्याची चिंता आम्हाला सारखी सतावत होती. धीरजची शाळा घरापासून २० किलोमीटर लांब होती, त्यामुळे तो हॉस्टेलमध्येच राहायचा. तिथे त्याने अनेक फुटबॉलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या आईनेही त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याने फुटबॉलचा नाद कधीच सोडला नाही. मतभेद असले तरी आता मात्र त्याला भारतीय संघात खेळताना पाहून खूपच आनंद होत आहे. त्याचा खेळ पाहून लोक कौतुक करतात, त्याची स्तुती ऐकून मनाला खूप समाधान वाटतं’ अशी भावना सामना पाहायला आलेल्या त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.
आई वडिलांच्या विरोधामुळे धीरजला फुटबॉल किट कधीच विकत घेता आला नाही. तेव्हा किट हवा असेल तर तो नेहमी आजीकडे मदत मागायचा अशा अनेक आठवणी त्याच्या वडिलांनी सांगितल्या.