फुटबॉलचं वेड त्याच्या नसानसांत भिनलं आहे आणि याच वेडापायी केरळमधल्या क्लिफननं चक्क ४ हजार किलोमीटर सायकलनं प्रवास करत रशिया गाठली आहे. एखाद्या खेळ्याचं वेड काय असतं याची प्रचिती पुन्हा एकदा या निमित्तानं आली. क्लिफन मुळचा केरळचा आहे. केरळमध्ये फुटबॉल चाहत्यांची संख्या खूपच जास्त आहे आणि फुटबॉलच्या निस्सिम चाहत्यांपैकी क्लिफन फ्रान्सिसही एक आहे. येत्या काही दिवसांत तो मॉस्कोमध्ये सालकलनं पोहोचणार आहे. फुटबॉलचे सामने आणि मेस्सीला याची देही याची डोळा पाहता यावं यासाठी सारा खटाटोप त्यानं केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात त्याच्या सायकलवरीला सुरूवात झाली. भारतातून विमानानं प्रवास करत क्लिफन दुबईला पोहोचला. तिथे सायकल विकत घेतली आणि तिथून पुढे त्याचा रशियाचा प्रवास सुरू झाला. इराण, अझबैजान, जॉर्जिया असा प्रवास करत तो अखेर रशियात पोहोचला आहे. खरंतर क्लिफनची सायकलवारी सोप्पी नक्कीच नव्हती. क्लिफन सुरूवातीला इराणला पोहोचला. खरं तर इराण म्हटलं की अनेक गोष्टी त्याच्यासमोर उभ्या राहिल्या. या देशात आपण जिंवत राहू की नाही अशी भीती क्लिफनला होती. पण इराणमध्ये पोहोचल्यावर त्याला वेगळाच अनुभव आला. भारतीय असल्याचं कळताच अनेक इराणी कुटुंबांनी आपलं जंगी स्वागत केलं असंही तो म्हणाला. इराणमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट पाहिले जातात. इथले लोक बॉलिवूड सिनेमांचे मोठे चाहते आहेत. काही जणं हिंदीही उत्तम बोलतात. इराण प्रवासात आपल्याला मशिदीत राहण्याचीही मुभा होती असाही अनुभव त्यानं ‘द विक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
इराणच्या तुलनेत अझबैजानचा अनुभव थोडा वाईट होता. इथे कोणालाच इंग्रजी किंवा हिंदी यायचं नाही त्यामुळे इथला प्रवास खूपच कठीण होता. पण, इथे स्थायिक असलेलं एक मल्याळी कुटुंब त्याच्या मदतीला धावून आलं इतकंच नाही तर इंग्रजी भाषा येत नसलेल्या पोलिसांनीदेखील आपल्याला मदत केल्याचं त्यानं सांगितलं. अखेर काही जर्मन सायकलपटूंसोबत तो रशियात पोहोचला आहे. क्लिफनच्या प्रवासातला ७०० किलोमीटरचा टप्पा अजूनही बाकी आहे. पुढील आठवड्यात तो मॉस्कोत पोहोचणं अपेक्षित आहे.
या सायकल प्रवासासाठी क्लिफन कित्येक दिवसांपासून पैशांची बचत करत होता. गणिताचे क्लास घेऊन त्यानं पैसे जमवले होते. मेस्सीला पाहण्यासाठी क्लिफन रशियात पोहोचला आहे. आता मेस्सीला जवळून पाहता यावं, त्याच्यासोबत फोटो काढता यावा एवढीच त्याची इच्छा आहे.