सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भांडणाचे, मारामारीचे व्हिडीओ असतात, जे पाहून अक्षरश: धक्काच बसतो. अनेकदा या वादाचं रुपांतर मारामारीत होतं. तर अनेकदा अशीही परिस्थिती येते जिथे समोरच्याची चूक नसतानाही त्याला ऐकून घ्याव लागतं. सध्या अशीच घटना मुंबई विमानतळावर घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई विमानतळावर महिलेची दादागिरी
मुंबई विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली जिथे एका महिलेने ओला कॅब ड्रायव्हरला तिची फ्लाइट चुकली म्हणून मारहाण केली. ही घटना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला ड्रायव्हरचा पाठलाग करताना, तसेच त्याला शिवीगाळ करताना आणि लाथा बुक्क्याने मारताना दिसतेय. महिलेची फ्लाइट चुकल्यामुळे आणि विलंबासाठी तिने कॅब ड्रायव्हरला जबाबदार धरले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. घरूनच उशीरा निघाल्यामुळे हे सगळं झालं हे स्वीकारण्याऐवजी तिने आपला राग ड्रायव्हरवर काढला.
महिलेने त्या ड्रायव्हरचा सार्वजनिकपणे अपमान केला. ड्रायव्हरच्या मागे पळत जात ती त्याला मारताना दिसतेय. या सगळ्यात ड्रायव्हर तिच्यापासून लांब जाऊन तिचे हल्ले टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच काहीही ऐकून न घेता महिलेने आपले आक्रमक वर्तन सुरूच ठेवले आणि त्याला रस्त्यावर वारंवार मारहाण केली. या व्हायरल व्हिडिओमध्ये, कॅब ड्रायव्हरला त्रास होताना दिसतोय, तो हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतानादेखील दिसत आहे.
संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @NCMIndiaa या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा मुलींना सरळ आत टाकावे”, तर दुसर्याने “पोलिसांनी संबंधित महिलेवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “तिची हिंमत कशी झाली ड्रायव्हरबरोबर असे उद्धट वर्तन करायची”
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या महिलेच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आणि याला ‘लज्जास्पद’ म्हटले आणि कठोर कारवाईची मागणी केली. अनेकांनी कॅब ड्रायव्हरबद्दल सहानुभूती दाखवली. आत्तापर्यंत या प्रकरणात कोणतीही कारवाई केल्याची पुष्टी करणारे कोणतेही वृत्त नाही.