होणा-या पत्नीला व्हिसा मिळत नसल्याने महिन्याभरापूर्वी नरेश तिवानी या तरुणाने अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुषमा स्वराजपासून ते पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना साकडे घातले होते. सोशल मीडियावर सगळीकडे नरेशच्या विवाहाची चर्चा होती. कराची येथे राहणा-या प्रिया बच्चानी या तरुणीशी त्याचा विवाह ठरला होता. पण लग्नाला अवघा एक महिना असताना त्याच्या पत्नीला मात्र व्हिसा नाकारला गेला, त्यामुळे आपले लग्न कधी होणार अशी चिंता त्याला लागली. अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज त्याच्या मदतीला धावून आल्या. लग्नादिवशी वधु भारतात असेल असे आश्वासन त्यांनी नरेशला दिले आणि स्वराज यांनी ते पाळले देखील. नरेशची होणारी पत्नी प्रिया बच्चानी भारतात आली असून त्यांच्या विवाह सोहळ्याला सुरूवातही झाली.
७ नोव्हेंबरला म्हणजे आज जोधपुर येते त्यांचे लग्न आहे. सोशल मीडियावर व-हाडी मंडळीच्या स्वागतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाची मदत घेऊन नरेशने स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. त्यामुळे सोशल मीडियावर प्रिया आणि नरेश हे जोपडे चर्चेत होते. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध तणापूर्व आहेत त्यामुळे आपले लग्न होणार की नाही अशी चिंता त्यालाही सतावत होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या वधुला व्हिसा मिळावा अशी विनंती ट्विटद्वारे केली होती. अखेर व्हिसाची ही समस्या सुषमा स्वराज यांनी दूर करत त्यांच्या विवाह सोहळ्यातील मोठी अडचण दूर केली. दोन वर्षांपूर्वी नरेशचा प्रियाशी साखरपूडा झाला होता. परंतु व्हिसाच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना व्हिसा मिळत नव्हता.