Anand Mahindra Takes A Drive On Atal Setu Bridge : मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) किंवा देशातील सर्वांत लांब म्हणून ओळख असलेल्या अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यानंतर हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला, आतापर्यंत अनेकांनी या पुलावरून प्रवास करण्याचा आनंद घेतला. त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरही ट्रेंड झाले. त्यात आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही अटल सेतूवरून प्रवास करण्याची इच्छा अखेर पूर्ण केली आहे. त्यांनी मुंबईतील अटल सेतूचा एक व्हिडीओ शेअर करीत त्यावरून वाहन चालविण्याचा अनुभव शेअर केला आहे.
आनंद महिंद्रांनी पुलाचे केले कौतुक
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओतून पुलाचे सौंदर्य स्पष्टपणे पाहता येते. आनंद महिंद्रा यांनी ड्रायव्हिंगचा आनंद लुटला, यावेळी त्यांनी अभियांत्रिकी कौशल्याचे खूप कौतुक केले. आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, अखेर गेल्या आठवड्यातच मला अटल सेतूवर गाडी चालविण्याची संधी मिळाली. हे अभियांत्रिकीचे एक अद्भुत, उत्तम उदाहरण आहे. या पुलावरून प्रवास करणे म्हणजे पाण्यावर धावणाऱ्या हॉवरक्राफ्टमध्ये बसून प्रवास करण्यासारखा अनुभव आहे. मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी मी या पुलाचा वापर केला. पण, संध्याकाळी या पुलावरून दिसणारे सौंदर्य मला पाहता आला आले नाही. त्यामुळे संध्याकाळी पुलावरून दिसणारे सौंदर्य पाहण्यासाठी पुन्हा एकदा लवकरच प्रवास करेन.
आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर आता अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी अटल सेतूवरून आनंद महिंद्रांसारखचा ड्रायव्हिंगचा अनुभव शेअर केला आहे.
अटल सेतूची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली होती. हा भारतातील सर्वांत लांब सागरी पूल आहे. त्याची एकूण लांबी २१.८ किमी आहे, त्यापैकी सुमारे १६.५ किमी समुद्रावर आणि ५.५ किमी जमिनीवर आहे.
या पुलाच्या माध्यमातून मुंबईआणि नवी मुंबई जोडली गेली आहे. मुंबई ते नवी मुंबई हे रस्त्याने पार करण्याचे अंतर अंदाजे ४२ किलोमीटर आहे; जे पार करण्यासाठी दोन तास लागले. मात्र, अटल पूल बांधल्यानंतर आता हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येत आहे. या पुलाच्या उभारणीसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च आला आहे.