Fire at petrol pump: पेट्रोल पंपावर घडणाऱ्या घटनांचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामध्ये आग लागण्याच्या घटनांचं प्रमाण जरा जास्तच आहे. पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका, मोबाईलचा वापर टाळा, असं अगदी ठळक शब्दांत लिहिलेलं असतानाही काही नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अशा धक्कादायक घटना उदभवतात.
या घटनांमध्ये अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत माणसाच्या एका चुकीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असते; पण महिलेच्या धाडसी कृत्यामुळे अवघ्या १२ सेकंदांत घटना आटोक्यात आली.
व्हायरल व्हिडीओ (Fire at Petrol Pump Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अनेक दुचाकीस्वार पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाट पाहताना दिसतायत. तसेच पेट्रोल पंपावर काम करणारी महिला कर्मचारी एका दुचाकीचं पेट्रोल भरून मागे सरकते. तितक्यात एका मालवाहू दुचाकीस्वाराची बाईक अचानक पेट घेते हे कळताच गाडीवर बसलेला इसम लगेच बाजूला होतो. आजूबाजूला जमलेली माणसं प्रसंगावधान बाळगून लगेच तिथून मागे सरकतात.
कसलाही विचार न करता अवघ्या १२ सेकंदांत (Fire at Petrol Pump) महिला कर्मचारी अग्निशामक यंत्राने फवारा मारून ती आग विझवते. हा व्हिडीओ परदेशातला असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओत मालवाहू दुचाकीस्वाराच्या हातात मोबाईल असतो. नंतर तो इसम मोबाईल खिशात ठेवतो आणि लगेच गाडी पेट घेते. हा व्हिडीओ sachkadwahai या इन्स्टाग्राम पेजवरून व्हायरल झाला आहे. ‘पेट्रोल पंपावर कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं वीरतापूर्वक अगदी १२ सेकंदांत आग थांबवली. तिच्या धाडसामुळे ही दुर्घटना लगेच आटोक्यात आली. या धाडसी महिलेला सलाम!’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
महिलेच्या धाडसाची प्रशंसा (Fire at Petrol pump, Users Comments)
एका सोशल मीडिया युजरने कमेंट करीत लिहिलं, “एका क्षणाचाही विलंब न करता महिलेने अगदी धाडसी कृत्य केलं आहे. तिचं हे कृत्य प्रसंशनीय आहे.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “महिला शूर असतात.”