१२- १२ तास काम करूनही पोलिसांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. फिरोजाबाद पोलिस दलातील हवालदार मनोज कुमार यांनी हा व्हिडीओ बनवला होता ज्यात त्यांनी जेवणाचे ताट दाखवून अन्नाच्या दर्जाविषयी तक्रार केली आहे. आपल्याला दिले जाणारे अन्न कोणी प्राणी सुद्धा खाऊ शकत नाही, पण याबाबत तक्रार केल्यास आपल्यावर दबाव आणून आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणत अखेरीस मदतीसाठी मनोज कुमार यांनी नेटकऱ्यांना भावनिक साद घातली आहे.

मनोज कुमार हे अलिगढचे रहिवासी असून २०१८ च्या बॅचचे पोलिस हवालदार आहे. फिरोजाबाद ही त्यांची पहिली पोस्टिंग आहे. मनोज यांचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या अस्वस्थ आहेत. मनोज कुमार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांनी जेवणाच्या दर्जा संबंधित तक्रार घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता उलट शांत राहण्याची तंबी देण्यात आली. अन्यथा कामावरून काढून टाकण्यात येईल असेही सांगितले होते. अशाच प्रकारच्या वागणुकीमुळे अनेक हवालदार आत्महत्या करत आहेत असा गंभीर आरोप सुद्धा कुमार यांनी केला आहे.

फिरोजाबाद पोलिसांनी यासंदर्भात एक ट्विट करून सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करताना दिसणारे हवालदार मनोज कुमार यांना गेल्या काही वर्षांत १५ वेळा कारवाईला सामोरे जावे लागले आहे – गैरहजर राहण्यापासून ते शिस्तीचं पालन न केल्याबाबत निष्काळजीपणासाठी त्यांच्यवर कारवाई करण्यात आली आहे.

कडक माल था! पोलिसांची इंस्टाग्राम पोस्ट पाहून नेटकरी हैराण; खरं कारण होतं…

दरम्यान, याबाबत फिरोजाबाद पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांनी मंडळ अधिकारी (शहर) अभिषेक श्रीवास्तव यांना चौकशीचे निर्देश दिले.तसेच या खानावळीत सुमारे १०० पोलिसांसाठी जेवण मेसमध्ये तयार केले जाते. सध्या चौकशी सुरु असून अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी दिली. तसेच ज्यादिवशी हा व्हिडीओ शूट करण्यात आला तेव्हा सकाळी मनोज यांना जेवण देण्यात उशीर झाल्याने मनोज व खानावळीचे निरीक्षक यांच्यात वाद झाला होता. याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा व्हिडीओ बनवल्याचे राखीव पोलीस लाईन्सचे निरीक्षक देवेंद्रसिंग सिकरवार यांनी सांगितले.

Story img Loader