एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे, दुसरीकडे त्यांना महिलांसाठी तालिबानी नियम लावायचे आहेत. हिंदू धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म आहे. हा धर्म कायमच महिलांचा आदर करत आला आहे त्यांना स्वातंत्र्य देणारा आहे. मग हे कोणत्या संस्कृतीबाबत बोलत आहेत? असा प्रश्न आता उर्फी जावेदने भाजपाला आणि चित्रा वाघ यांना विचारला आहे. उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कमी कपड्यांतल्या वावरावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेद सुधारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांना आता उर्फीने पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी काय म्हटलं आहे उर्फी जावेदने?

महिलांच्या कपड्यांबाबत तालिबानी नियम लादणाऱ्यांना हिंदू राष्ट्रही हवं आहे. पण ही यांची कुठली संस्कृती आहे? भारतीय संस्कृती ही महिलांचा आदर करणारी आणि त्यांना स्वातंत्र्य देणारी आहे. मी तुम्हाला सांगते की संस्कृतीचा भाग काय नाही? बलात्कार, डान्स बार, राजकारण्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून उघड धमक्या देणं हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही असंही ट्विट उर्फी जावेदने केलं आहे.

आणखी वाचा – ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

उर्फी जावेदने ट्विट केला ऐतिहासिक फोटो

उर्फी जावेदने या ट्विटसोबतच स्त्रीचा प्राचीन इतिहासातला फोटोही ट्विट केला आहे. प्राचीन काळात हिंदू स्त्रिया कशा प्रकारे वस्त्रालंकार करत होत्या एकदा बघा. त्या काळातही महिलांना त्यांचे कपडे, त्यांची वस्त्रं, आभूषणं निवडण्याचा अधिकार होता. त्या महिला खेळांमध्ये, राजकारणात सहभाग घेत होत्या. त्या काळातले हिंदू हे सर्वसमावेशक होते. त्यांच्याकडून जरा भारतीय संस्कृती शिका असंही उर्फी जावेदने सुनावलं आहे.

आणखी वाचा – विश्लेषण: चित्रा वाघ आणि वाद हे समीकरण नेमके काय आहे?

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उर्फीविरोधात आक्रमक

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या उर्फी जावेद विरोधात आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेदवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही आणि ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. माझी लढाई उर्फी विरोधात नाहीच. तर तिच्या विकृतीच्या विरोधात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ विरूद्ध उर्फी जावेद असा सामना रंगला आहे. उर्फी अत्यंत तोकडे कपडे घालते, रस्त्यावर तिचा नंगानाच सुरू असतो. महिला आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे तसंच पोलिसांना हे दिसत नाही का? असेही प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केले होते. तर उर्फी जावेद प्रत्येक वेळी ट्विटच्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देत असते. आत्ताही उर्फीने तीन ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!

उर्फीने पोलिसांकडे नोंदवला जबाब

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीची तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून उर्फीने तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर तीन ट्विट करत हिंदू संस्कृती काय ते आधी समजून घ्या असं म्हणत चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळणार हेच दिसून येतं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First study what is hindu culture and then teach me urfi javed answer to chitra wagh and bjp scj