एका मच्छिमारामुळे समुद्रात अडकलेल्या 18 महिन्यांच्या चिमुरड्याला जीवनदान मिळालं आहे. चमत्कारिकरित्या चिमुरडा वाचला असून मच्छिमाराला सुरुवातीला पाण्यात एखादी बाहुली तरंगत असावी असं वाटत होतं. पण जेव्हा त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याचा त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसला नाही. कारण ती बाहुली नाही तर एक 18 महिन्यांचा चिमुरडा होता. विशेष म्हणजे चिमुरडा जिवंत होता. मच्छिमाराने कोणताही वेळ न दवडता चिमुरड्याचा जीव वाचवला. न्यूझीलंडमध्ये ही घटना घडली आहे.

गस हट असं या मच्छिमाराचं नाव असून 26 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता ते समुद्रात मच्छिमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांना समुद्रात बाहुलीसारखं काहीतरी तरंगत असल्याचं दिसंल. मी जवळ जाऊन पाहिल्यानंतरही ती बाहुलीच असावी असं वाटत होतं असं त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

उत्तर बेटावरील मॅटाटा बीचवर चिमुरडा आपल्या आई वडिलांसोबत गेला होता. आई, वडिल तंबूत झोपले असताना चिमुरडा तेथून बाहेर पळाला आणि थेट समुद्रात गेला. विशेष आणि नशिबाची गोष्ट म्हणजे गस हट यांनीदेखील नेहमीच्या ठिकाणी मासेमारी न करता वेगळ्या जागेवर जाण्याचं ठरवलं.

‘माझे पती हातात एका बाळाला घेऊन घरात आले होते. मी लगेचच घरात जाऊन टॉवेल आणि काही ब्लँकेट घेऊन आले जेणेकरुन बाळाला थंडी वाजू नये. तो थंडीने कुडकुडत होता’, असं गस हट यांच्या पत्नीने सांगितलं आहे. गस हट आणि त्यांच्या पत्नीने नंतर हे बाळ कोणाचं आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच्या आई, वडिलांनी आपला चिमुरडा जाग्यावर नाहीये याची कल्पनाच नव्हती. ‘त्यांना झोपेतून उठवल्यानंतर आपला चिमुरडा जागेवर नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे सर्वांसाठी धक्कादायक होतं’, अशी माहिती गस हट यांच्या पत्नीने दिली आहे.

मातीमध्ये चिमुरड्याचे पावलांचे ठसे दिसत होते, ज्यावरुन तो कोणत्या मार्गाने समुद्रात गेला असावा हे लक्षात आलं. चिमुरडा जवळपास 50 फूटापर्यंत वाहून गेला होता. ‘जर मी तिथे नसतो किंवा अजून एक मिनिट उशिरा पोहोचलो असतो तर चिमुरडा दिसला नसता’, असं गस हट यांनी सांगितलं आहे. मी तिथे जाणं आणि त्याचं वाचणं हे नसिशाबतच होतं असं त्यांनी म्हटलं आहे. चिमुरड्याला पाहिल्यानंतर त्याच्या आईने तर घट्ट मिठी मारत गस हट यांचे आभार मानले.