सुशी हा एक जगप्रसिद्ध जापानी पदार्थ आहे. सुशी पारंपरिक पदार्थ असून, त्यामध्ये बरीच विविधता आणि नाविन्य आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक देशानुरूप, व्यक्तीच्या आवडीनुसार त्याच्या चवीत थोडा फार बदल होत असतो. अशी ही सुशी जगभरात प्रसिद्ध असली तरीही त्याची चव खाताक्षणी प्रत्येकाला आवडेलच असं नाही. असंच काहीसं एका पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत झालेलं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या पाच वर्षांच्या मुलीचा, पहिल्यांदाच सुशीची चव घेतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांना या गोंडस मुलीची, सुशी खाल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे हे बघण्याची उत्सुकता होती. कारण सुशीची चव आणि पदार्थाचे वेगळेपण हे सर्वच त्या मुलीसाठी नवीन होते. त्यामुळे व्हिडीओमाधील सुशीचा घास खाल्ल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदीच बघण्यासारखे आहेत.
@cristalallure या इन्स्टाग्राम हँडलने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला चॉपस्टिक्सने सुशी भरवतानाचा हा रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रीलमध्ये @cristalallure हिने, तिच्यात आणि तिच्या मुलींमध्ये होणारे संभाषण लेखी स्वरूपात टाकले असून ते काहीसे असे आहे.
“माझ्या मुलीने, ‘तिला सुशीची चव घेऊन बघायची आहे’ असे सांगितले.” त्या मुलीने हे सांगताच, तिच्या आईने सुशीचा एक तुकडा चॉपस्टिक्सच्या मदतीने आपल्या मुलीला भरवला. तिनेही तो अगदी कौतुकाने नीट व्यवस्थित चावून खाल्ला. त्यावर तिच्या आईने, सुशी खायला आवडली का असे विचारल्यावर, “मला अजिबात नाही आवडली”, असे सांगून मोकळी झाली. पण, त्यावर आईने तिला समजावण्यासाठी सांगितले की, “तू तर हा पदार्थ पहिल्यांदाच खाऊन पाहिलास आणि अजून तू फक्त पाचच वर्षांची आहेस.” त्यावर तिने अगदी शांतपणे आणि हुशारीने, “मग कदाचित मी सहा वर्षांची झाल्यावर मला हा पदार्थ आवडेल”, असे उत्तर दिलेले तुम्हाला या रीलमध्ये दिसेल.
आत्तापर्यंत या निरागस आणि गोंडस व्हिडीओला ११ मिलियन इस्तके व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केलेल्या आहेत. प्रतिक्रियांमध्ये, या लहान मुलीने आपल्या तोंडातील संपूर्ण घास संपवून मग आपलं मत मांडल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे; तर काहींनी तिचे विचार किती चांगले आहेत, असे काहीसे लिहिले आहे.
हेही वाचा : चिमुकल्या शेफने दाखवली स्प्रिंग रोलची रेसिपी; रेसिपी घ्या आणि ‘हा’ पदार्थ वापरून पाच मिनिटांत बनवून पाहा….
या व्हायरल व्हिडीओवर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहू :
“किती गुणी मुलगी आहे. तिला तो पदार्थ आवडला नसला तरीही तिने तो सगळा घास संपवला”, अशी एकाने प्रतिक्रिया दिली; तर दुसऱ्याने “या चिमुकलीने, सुशी व्यवस्थित खाऊन मग त्यावर तिचं मत मांडले हे मला फारच आवडले”, अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या व्यक्तीने, “आता पुढच्या वर्षी पुन्हा इथे या” असे म्हणत आहे. चौथ्या व्यक्तीने कमेंटमध्ये आपला अनुभवदेखील सांगितला आहे, “मला वाटतं, लहान असताना कोणालाच सुशी आवडत नसावी, मला पण आवडत नसे; पण आता बघा मला जाईल तितकी सुशी मी आवडीने खाते.” तर शेवटी पाचव्या व्यक्तीने, “या लहान मुलीने पदार्थ आवडला नसला तरीही अन्नाचा आदर करून, तोंडातला घास संपवला. आशीर्वाद!” असे कौतुकदेखील केले आहे.