जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आणि अतिशय कमी कालावधीत एखादी गोष्ट एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचू लागली. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने हे आणखी सोपे झाले. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून मागच्या वर्षभरात काही व्हिडियो अतिशय कमी कालावधीत लाखो लोकांपर्यंत पोहोचले. यामध्ये काही व्यक्ती तसेच काही घटना लक्षात राहण्यासारख्या असतात. अभिनेत्री प्रिया वॉरीयर, डान्सिंग अंकल, वहिलीचा लग्नातील डान्स, न्यूजरुममध्ये आपल्या को अँकरशी भांडणारी महिला अँकर, रँप वॉकवर आलेली कॅट हे काही विशेष गाजलेले व्हिडियो. या व्हिडियोला नेटीझन्सनी मागील वर्षात मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांतून हे व्हिडियो व्हायरल झाले असून पाहूयात या व्हिडियोंविषयी विस्ताराने…

१. डान्सिंग अंकल

डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध असणारे संजीव श्रीवास्तव हे ४६ वर्षांचे आहेत. ते मध्यप्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. मिथुन आणि गोविंदा हे आपले डान्समधील आयडॉल असल्याचे डान्सिंग अंकल नेहमीच सांगतात. आपल्या या डान्सिंगमुळे श्रीवास्तव विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले आहेत. याआधी त्यांचे अनेक व्हिडियो व्हायरल झाले असून त्यांना नोटीझन्सकडून मोठी पसंती मिळाली होती. त्यांच्या डान्सच्या या कलेमुळे अर्जुन कपूर, रविना टंडन, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, दिव्या दत्ता आणि संध्या मेनन यांच्याकडूनही कौतुक झाले आहे. गोविंदाने तर डान्सिंग अंकल आपल्या स्टेप्स अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे म्हटत त्यांचे कौतुक केले होते.

२. प्रिया वारियर

प्रिया वारियर ही मल्ल्याळम अभिनेत्री एक किंवा दोन दिवसात संपूर्ण भारताला माहित झाली. त्यामागचे कारण म्हणजे तिचा व्हायरल झालेला डोळा मारतानाचा एक व्हिडियो हे होते. २०१८ या वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रियाचं नाव अग्रस्थानी आहे. एका दिवसात इन्स्टाग्रामवर तिने सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील ‘माणिक्य मलरया पूवी’ या चित्रपटातील एका गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. प्रियाने केवळ भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतक्या प्रसिद्धीस पात्र ठरलेल्या प्रियाने लोकप्रियतेची सगळी गणितच बदलल्याचं पाहायला मिळतंय.

३. पाकिस्तानी पोलिसाची अनिल कपूर डायलॉगबाजी

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका पोलिसाने भारतातील अनिल कपूर या अभिनेत्याचे डायलॉग म्हटले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट वडाला’ या चित्रपटातील डायलॉग म्हटला. ‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं…इससे जादा मेरी जरुरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नही’ हा डायलॉग म्हटला. पोलिस निरीक्षक अरशद यांचा हा डायलॉग म्हणतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तो पाहिला. त्यानंतर पाकपतानचे जिल्हा पोलिस अधिकारी मारिक महमूद यांनी अरशद यांना लगेच कामावरुन बडतर्फ केले.

४. रॅंपवरील खराखुरा कॅटवॉक

तुर्कीमध्ये एस्मोड आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये ही दुर्मिळ घटना पाहायला मिळाली. इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये रॅंपवर अचानक मांजर आली. यामुळे शोमध्ये काहीतरी व्यत्यय येईल असे वाटले होते. मात्र तसे न होता रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्सने आपला वॉक नेहमीप्रमाणे सुरुच ठेवला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडियो शेअरही करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

५. बाळाचा बाबांसोबत लिपसिंक करतानाचा व्हिडियो

एका बाळाचा आपल्या बाबांसोबत लिपसिंक करतानाचा व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ही दोन वर्षांची मुलगी असून तिच्या आईने आपला नवरा आणि बाळ यांचा व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड केला. यात हे बाळ आपल्या बाबांच्या कडेवर बसल्याचे दिसत आहे. हे दोघाही आरशात पाहून वेगवेगळे हावभाव करत असल्याचे दिसत आहे. हे चिमुकले बाळ आपले बाबा ज्याप्रमाणे हावभाव करतील नेमके त्याचप्रमाणे हावभाव करत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे.

येत्या वर्षातही सोशल मीडियाद्वारे आपले असेच मनोरंजन होत राहील यात शंका नाही.