IndiGo flight from Mumbai to Qatar’s Doha was delayed: सोशल मीडियावर दररोज काही ना काही गोंधळ पाहायला मिळतात. कधी रस्त्यावर, कधी रेल्वेस्थानकावर तर कधी बसमध्ये, एवढंच नाही, तर विमानातही गडबड-गोंधळाचे दर्शन होते. दरम्यान, नुकताच मुंबई विमानतळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवासी विमानतळावर गोंधळ घालताना दिसत आहेत. मुंबई ते कतारच्या विमानाला उशीर झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रागाने लेडी स्टाफवर ओरडत आहे, तर लेडी स्टाफ खूपच घाबरल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ तुम्हीच पाहा आणि सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबई विमानतळाचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून कतारला जाणारे विमान पहाटे ३.५५ वाजता उड्डाण घेणार होते, ते पाच तास उशिराने निघाले. त्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गदारोळ सुरू असताना एक व्यक्ती चांगलीच आक्रमक झाली आणि त्याने महिला कर्मचाऱ्यांवर ओरडायला सुरुवात केली. “तुमचे हे नेहमीचे वागणे आहे. आम्ही गेल्या पाच तासांपासून वाट पाहत आहोत आणि तुम्ही अजूनही १० मिनिटे थांबायला सांगत आहात.” यावेळी या पुरुषाबरोबरच असलेली महिला त्या महिला कर्मचाऱ्यांना “तुमची ही शेवटची १० मिनिटे” असल्याचे सांगत, “त्यानंतर आम्ही बघू” असा इशारा देते. यावेळी महिला कर्मचारी विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे ओरडणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटच्या खराब सेवेबद्दल लोक अनेकदा तक्रारी करतात. कधी खाण्यापिण्यावरून वाद होतात, तर कधी विमान उशिरा सुटणार असल्यामुळे प्रवासी नाराज होतात. विमानांमध्ये सीटवरून तर अनेकदा भांडणे होतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये दिल्लीला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ झाला आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांना ‘बघून घेण्याची’ धमकीही दिली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! वाघ आणि अस्वलाचा आमना-सामना, शेवटी जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही
हा व्हिडीओ ghantagram_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो व्यक्तींनी पाहिला आहे आणि अनेकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे. यावेळी सोशल मीडिया युजर्स व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, त्यांना नीट धडा शिकवा. ते नेहमी फसवणूक करतात. दुसऱ्या युजरने लिहिले की, ग्राउंड स्टाफचा काय दोष? तुम्ही वरिष्ठांना सांगा. तर, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, कधीही इंडिगो फ्लाइटने प्रवास करू नका.