लक्जरी लाईफला कोणतीही सीमा नसते. जर तुमच्याकडे पैसे असतील तर खर्च करण्यासाठी संपूर्ण जगही अपुरे पडते. आता जर कुणाला पाण्यात तरंगणाऱ्या हॉटेलची मजा पाहिजे असेल तर यामध्ये आश्चर्यचकित करणारी कोणती गोष्ट राहिलेली नाही. अशा आलिशान हॉटेलमध्ये निसर्गरम्य वातावरण हिरवीगार झाडे व निळसर पाण्याच्या लहरी आणि त्यासोबत जेवणाची मेजवानी. हे सुख अनुभवण्यासाठी बडी रक्कम मोजावी लागते. पण कल्पना करा की, तुम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला परवडेल अशाच साध्या हॉटेलमध्ये गेलात आणि अचानक तुम्हाला या आलिशान हॉटेलमध्ये जेवणाचा सुखद अनुभव मिळाला तर….होय. असंच काहीसं करून दाखवलंय एका रेस्टॉरंटच्या मालकाने. याचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
थायलंडमध्ये सध्या महापुरानं हाहाकार माजवलाय. इथल्या अनेक शहरांमध्ये सध्या भयानक पूरपरिस्थिती निर्माण झालीय. तब्बल १० वर्षानंतर थायलंडमध्ये आलेल्या या जलप्रलयाने इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये पाणी घुसलंय. थायलंडमध्ये गेल्या १० वर्षांत इतका भीषण महापूर आला नव्हता. २०११ मध्ये आलेल्या महापुरानंतर पहिल्यांदाच थायलंडमध्ये इतकी भयानक परिस्थिती उद्भवलीय. अशा परिस्थितीत अनेकांचे संसार उघडे पडले आहेत तर कुणाचे मोठ मोठे हॉटेल पाण्यात वाहून गेले.
आधीच करोना परिस्थितीमुळे आर्थिक गणितं बिघडली होती, त्यावर कुठे परिस्थितीवर मात करण्यास सुरूवात केली होती, तितक्यात पुन्हा या महापूराचं संकट कोसळलंय. पण एका रेस्टॉरंट मालकाने निसर्गाच्या या प्रकोपापुढे हार मानली नाही. महापूरामुळे पाण्यात बुडालेलं रेस्टॉरंट त्याने बंद न करता सुरूच ठेवलंय. रेस्टॉरंट भोवती पूरामुळे साचलेल्या पाण्याचा फायदा घेत पाण्यात तरंगणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या मेजवानीचा अनोखा आनंद या रेस्टॉरंट मालकाने दिलाय. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
पाण्यात बुडालेल्या या रेस्टॉरंटचं नाव ‘रिव्हरसाइड रेस्टॉरंट’ असून हे बॅंकॉकमध्ये आहे. ‘रिव्हरसाइड रेस्टॉरंट’ चे मालक टिटिपॉर्न जुतिमानन यांना ही अनोखी कल्पना सुचली. थायलंडमधील पूराच्या पाण्याने वेढलेले हे ‘रिव्हरसाइड रेस्टॉरंट’मध्ये जेवणाची अनोखी मेजवानी घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. अवतीभवती पाणी असलेल्या टेबलवर बसून थाई फुडचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. २० ते ५० सेंटिमीटर इतक्या उंचीवर पर्यंतच्या पाण्यातल्या या रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी काही लोक अक्षरशः पायात रबर बूट घालून येताना दिसून येत आहेत.
बँकॉकजवळील नोंथाबुरी इथे असलेलं हे रेस्टॉरंट नुकतंच गेल्या फेब्रूवारीमध्ये नदी किनारी सुरू करण्यात आलं होतं. प्राचीन वास्तुकला आणि सजावटीने सुसज्ज असं हे रेस्टॉरंट होतं. परंतू बँकॉकच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चाओ फ्राया या नदीला महापूर आल्याने नदी किनारी वसलेल्या या रेस्टॉरंटचं रूपच पालटून गेलं. रेस्टॉरंटचे मालक टिटिपॉर्न जुतिमानन यांनी या अनोख्या मेजवानीला ‘हॉट-पॉट सर्फिंग’ असं नाव दिलंय. हा आनंद लुटण्यासाठी लोक अक्षरशः बोटीने प्रवास करत या रेस्टॉरंटमध्ये येताना दिसून येत आहेत. नदीत धावणाऱ्या बोटीदेखील या रेस्टॉरंटमध्ये येऊन अनोख्या मेजवानीचा आनंद घेऊन मगच पुढे जाताना दिसून येत आहेत. जणू काही एका बीचवर बसून जेवण करत असल्याचा सुखद अनुभव इथे मिळतोय.