सोशल मीडियावर अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या किनारी भागातील वादळाचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भयंकर वादळ जहाजावर आदळल्याचं पाहायाला मिळत आहे. वादळामुळे जहाजावरील अनेक वस्तू हवेत उडल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. फ्लोरिडातील पोर्ट कैनावेरल येथील रॉयल कॅरिबियन नावाच्या जहाजाला वादळाचा तडाखा बसला. या जहाजात काही लोक बसले होते शिवाय ते समुद्रात जाणार होते इतक्यात वादळ आले. हे वादळ इतकं भयानक होतं की जहाजावर ठेवलेल्या वस्तू क्षणात हवेत पालापाचोळ्याप्रमाणे उडू लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वादळामुळे जहाजाच्या वरच्या भागात ठेवलेल्या खुर्च्या, मोठमोठ्या छत्र्या आणि लहान वस्तू उडताना दिसत आहेत. यातील काही वस्तू प्रवाशांच्या डोक्यावर पडल्याने काहींना किरकोळ दुखापत आहे. वास्तविक, फ्लोरिडा राज्याला मेटोत्सुनामीचा सामना करावा लागला, जो जोरदार वाऱ्यांसह वादळामुळे होतो. तर भूकंपामुळे मोठी त्सुनामी येते.
वादळामुळे तिघांचा मृत्यू –
या वादळाचा परिणाम अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिण भागात दिसून आला आहे. या वादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर तीन लोकांच्या मृत्यूचीदेखील नोंद करण्यात आली आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसचे म्हणणे आहे की रविवारी मध्य इंडियाना आणि आर्कान्सासमध्ये अनेक चक्रीवादळे आणि जोरदार गडगडाटी वादळांची सूचना मुळाली होती. सोशल मीडियावर पडलेली झाडे, उद्ध्वस्त घरांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर वादळामुळे अनेक राज्यांमध्ये गारपीटही झाली आहे.
मेटोत्सुनामी म्हणजे काय, नुकसान कशामुळे झाले?
जेव्हा समुद्रात एकामागून एक वादळे येतात, तेव्हा त्यांची मालिका तयार होते आणि या वादळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० मैल इतका असतो. यावेळी वारा पाण्याला वरती खेचतो, ज्यामुळे किनारपट्टीवर उंच लाटा उसळू लागतात. या उंच लाटा किनाऱ्यावर आदळल्यानंतर ओसरतात. यालाच मेटोत्सुनामी असे म्हणतात. मेटोत्सुनामी जास्तीत जास्त एक तास टिकते, कारण ती किनारपट्टीवर आदळताच थांबते. फ्लोरिडामध्ये झालेल्या मेटोत्सुनामीमुळे अडीच फूट उंच लाटा उसळल्यची माहिती समोर आली आहे.