देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो, हे स्वातंत्र्यवीर सावकरांचे वाक्य आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. मात्र या देशाचा देव मानणाऱ्या एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायर होत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी असणाऱ्या सुधा रामेन यांनी ट्विटवरुन शेअर केला आहे. १६ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला त्यांनी, “मागील काही काळामध्ये पाहिलेली मी सर्वोत्तम व्हिडिओ क्लिप आहे. आपण आपल्या देशाचा आदर कसा करावा हे यामधून दिसते,” अशी कॅप्शन दिली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेला हा व्हिडिओ म्हणजे एक सीसीटीव्ही फुटेज आहे. एका घरासमोरील ध्वजस्तंभावर १५ ऑगस्टचे झेंडावंदन झाल्यानंतरचे हे दृष्य आहे. झेंडावंदनासाठी केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात काढण्यात आलेली रांगोळी, सजवलेला ध्वजस्तंभ असं सारं चित्र या व्हिडिओत दिसत आहे. अचानक रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या या आजीबाई या झेंडावंदन करण्यात आलेल्या ध्वजस्तंभासमोर थांबतात. हातातील पिशवी रस्तावरच ठेवतात. तिथेच पायातील चप्पल काढतात. ध्वजस्तंभाजवळ चालत येतात. देवाच्या पाया पडतो तसं दोन्ही हात लावून ध्वजस्तंभाच्या चौथऱ्याच्या पाया पडतात. थोड्या मागे जातात सलाम करतात. पुन्हा पिशवी उचलून, पायात चप्पल घालून चालू लागतात.

हा व्हिडिओ १३ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. तर ५५ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे. या व्हिडिओवर जवळजवळ ६०० जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी या आजींच्या देशभक्तीच्या भावनेला सलाम केला आहे. काहींनी हा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याचं म्हटलं आहे तर काहींनी अंगावर काटा आल्याचे म्हटलं आहे. अनेकांनी या देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या अशा लोकांमुळे आपण महान देश आहोत अशी भावनाही या ट्विटवर रिप्लाय करताना व्यक्त केली आहे.

Story img Loader