गुलाबजाम असे नुसते म्हटले तरीही भारतीयांच्या तोंडाला पाणी सुटेल. मिष्टान्नामधील एक महत्त्वाचा पदार्थ असणारा गुलाबजाम भारतीयांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पण या पदार्थाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचे हे न समजल्याने एका परदेशी फूड चॅनेलने अजब नाव दिले. गुलाबजामला त्यांनी ‘इंडियन फ्राईड डोनट’ म्हटल्याने भारतीयांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. या परदेशी वाहिनीवर गुलाबजामची रेसिपी दाखविण्यात आली. यामध्ये गुलाबजामचे इंग्रजीत वर्णन करताना फ्राईड डोनट म्हणण्यात आले. मात्र असे केल्याने भारतीय नागरिक भलतेच चिडले आणि त्यांनी सोशल मीडियावर परदेशी पदार्थांना नावे ठेवण्यास सुरुवात केली.

मग पिझ्झा म्हणजे चिज चपाती, हॉट डॉग म्हणजे लांबलचक वडापाव, टॅकोजला स्टफ फोल्डेड पापड, बर्गरला मांस आणि सॅलेड भरलेला वडापाव, फ्रेंच फ्राईजला झिरो फीगर बटाटा भजी अशी नावे दिली गेली. तर पॅनकेकला अमेरिकन मालपुआ, डोनटला चॉकलेट कोटेड मेदुवडा, मूसला चॉकलेट श्रीखंड, नाचोजला फाफडा अशी एकाहून एक भन्नाट नावे देण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे एका देशातील पदार्थ अगदी सहज दुसऱ्या देशात पोहोचत असतील तरी त्या पदार्थांची नावे आहेत तीच ठेवायला हवीत हा हट्ट यानिमित्ताने दिसून आला.

अशाप्रकारे गुलाबजामचे नामकरण करणाऱ्या फूड चॅनेलचे नाव टेस्टी असे असून ट्विटरवर हा वाद चांगलाच रंगला. मग आपल्या पदार्थांबाबत असणारा भारतीयांचा अभिमान जागा झाला आणि त्यांनी परदेशी पदार्थांचे भारतीय पद्धतीनुसार किंवा पदार्थांनुसार वर्णन करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अनेकांनी या वादावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. आमचा गुलाबजाम हा आमच्यासाठी गुलाबजामच आहे. तो तुमचा फ्राईड डोनट नाही असेही सुनवायला काहींनी कमी केले नाही.